For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

... तर सरकारची गरजच काय?

12:55 PM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
    तर सरकारची गरजच काय
Advertisement

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे सरकारसमोर आव्हान : नोकऱ्या निर्माण न केल्यास वेगळा विचार करण्याचे संकेत

Advertisement

वाळपई : पुढील अडीच वर्षांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्यास सरकार असमर्थ ठरले तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. हे सरकार जर नोकऱ्या निर्माण करू  शकत नसेल, तर या सरकारची गरजच काय? असा सवाल करुन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारला उघड आव्हान दिले आहे. त्याचबरोबर नोकऱ्या निर्माण होत नसतील तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दांत इशारा देत भविष्यातील वाटचालीचे संकेतही दिले आहेत. राणे यांच्या या विधानांमुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. काल बुधवारी वाळपई नगरपालिकेच्या सभागृहामध्ये भाजपा सभासद नोंदणी मोहीमेसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीमध्ये बोलताना त्यांनी वरील विधान केले आहे. या विधानाचे भाजपात, सरकारात, विरोधकांत तसेच एकंदर राजकीय क्षेत्रात तसेच जनमानसात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

बेरोजगारांना उत्तर कोणते द्यायचे?

Advertisement

राणे पुढे म्हणाले की सरकारने येणाऱ्या अडीच वर्षांमध्ये किमान 22 हजार नोकऱ्या तयार करणे गरजेचे असून प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान एक हजार नोकऱ्या देणे गरजेचे आहे. बेरोजगार युवकांच्या प्रŽांना उत्तर कोणते द्यायचे, असा सवाल आपल्यासमोर उपस्थित होतो. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असेही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.

महिलांनाही रोजगार मिळायला हवा

महिलांना आत्मनिर्भर करणे हे भाजपाचे उद्दिष्ट आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक प्रकारच्या योजना सरकारने जाहीर केल्या आणि त्यांची अंमलबजावणीही केली. यामुळे महिला भाजपावर विश्वास ठेवत आहेत. तरीही महिलांसाठी रोजगार निर्माण होणे ही महत्त्वाची बाब असून त्यांना नोकऱ्या देणे ही सरकारची जबाबदारी आहे.

नोकऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

सध्या भाजपाची सभासद नोंदणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात महिला, भगिनींनी भाजपाचे सभासद बनावे. येणाऱ्या काळात आपले भविष्य उज्ज्वल व्हायचे असेल आणि आपल्या मुलांना चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या असतील तर सरकारचा पाया भक्कम करणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या नोकऱ्या निर्माण होत नसल्या तरी, नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील, याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

 सरकारला विपरित परिणाम भोगावे लागतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारात व राज्यात भाजपाचे सरकार आहे आणि सुशिक्षित मुलांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. जोपर्यंत आपण नोकऱ्या देऊ शकत नाही, तोपर्यंत सरकारचे स्थान बळकट होऊ शकत नाही. सरकारने नोकऱ्या निर्मितीवर भर द्यावा, अन्यथा त्याचे विपरित परिणाम येणाऱ्या काळात भोगावे लागतील, असा इशारा राणे यांनी दिला. यावेळी बोलताना मंडळाचे अध्यक्ष रामनाथ डांगी यांनी सांगितले की भाजपाची सभासद नोंदणी प्रचंड प्रमाणात वाढू लागलेली आहे. आपल्या भागातील भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सभासद होतील, याकडे विशेष लक्ष द्यावे. नगराध्यक्ष प्रसन्ना गावस यांनी सांगितले की विकासाच्या वाटेवर चालायचे असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही. या बैठकीनंतर होंडा या ठिकाणी लक्ष्मी इस्टेट सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत आमदार डॉ. देविया राणे यांच्यासह पर्ये मतदारसंघातील विविध पंचायतीचे सरपंच उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार डॉ. देविया राणे सांगितले की पर्ये मतदारसंघामध्ये भाजपाचे मोठ्या प्रमाणात सभासद होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी भाजपच्या सर्व समित्यांनी विशेष सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

निवेदनात गैर काहीच नाही : राणे

वाढती बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यावर उपाय काढावा. पुढील दोन वर्षात 22 हजार रोजगार निर्माण करावेत, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार, असे निवेदन आपण केलेले आहे.  त्यात गैर काहीच नाही, आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले. आज आम्ही मंत्री आहोत, सरकार चालवतोय. आमचे ते कर्तव्य आहे. वाढती युवावर्गातील बेरोजगारी आम्हा सर्वांनाच तापदायक ठरणारी असते. त्यामुळे रोजगारसंधी होईल तेवढी निर्माण करणे सरकारच्या हातात असते. आपल्याला खात्री आहे मुख्यमंत्री त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील. आम्हाला पुढील दोन वर्षानंतर निवडणुकीला सामोरे जायचे असेल, तर युवावर्गाला आम्हाला खुश करावेच लागेल. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठीच आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सायंकाळी उशिरा दैनिक तऊण भारतशी बोलताना स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.