महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मग कार्यकर्त्यांनी काय घोडे मारलेय !

10:54 AM Jan 14, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / सुधाकर काशीद : 

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तर निवडणुकीच्या काळात टोकाचा कलगीतुरा सुरू होता. आता अलीकडच्या काळात फडणवीस व आदित्य ठाकरे तीन वेळा तास तासभर एकत्र आले. काय बोलले माहित नाही, पण ते सर्वांना चालते.

Advertisement

कोल्हापूर जिह्यात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील एकत्र आले. समारंभाच्या निमित्ताने त्यांचात गप्पांचा फडच रंगला. आम्ही ‘जिह्यात एकच आहोत,’ असे ते शेवटी सांगून गेले. हे खूप चांगले झाले. पण जिह्याच्या राजकारणात इतकी टोकाची ईर्षा आहे, की या इर्षेमुळे विभागलेले कार्यकर्ते काही निमित्ताने एका समारंभात एकत्र आले, एकमेकांच्या घरात गेले, एकमेकांच्या गाडीवरून फिरले तरी काही नेत्यांना ते आवडत नाही. लगेच त्या कार्यकर्त्यावर संशय व्यक्त होतो. नेता डुख धरतो. त्याला लांब-लांब ठेवतो. त्यामुळे कार्यकर्त्यांत तीव्र भावना आहेत. त्यांनी काही केले तरी चालते आणि आम्ही केले तर त्यात काय बिघडते? हीच बहुतेक कार्यकर्त्यांच्या मनातली खदखद आहे आणि ती आता उघड-उघड व्यक्तही होऊ लागली आहे.

राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही किंवा राजकारणात कोण कोणाचा नसतो, हे ‘उद्बोधक’ वाक्य नेत्यांबद्दल म्हणायला ठीक. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मात्र हे तत्व लागू नसते. कार्यकर्त्यांना मात्र नेता सांगेल तेच ऐकावे लागते. तो जाईल तिकडेच जावे लागते. अनेक गावांत नव्हे तर शहरातील कार्यकर्त्यांची नेत्या-नेत्यांत विभागणी झाली आहे. शहर व गावपातळीवर कार्यकर्त्यांना रोज या ना त्यानिमित्ताने एकमेकांची तोंडे पहावी लागतात. काही कामानिमित्त एकमेकांशी संबंध ठेवावे लागतात. अनेकांचे नातेसंबंध असतात. त्यामुळे एकत्र यावेच लागते. पण ते काही नेत्यांना आवडत नाही. आपला कार्यकर्ता तिकडच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे म्हणजे तो दोन्ही दरडीवर हात ठेवून आहे, असा संशय घेतला जातो. आणि ही परिस्थिती निर्माण व्हायला नेत्याभोवती जे 10-15 जण नेहमी असतात, तेच बऱ्यापैकी कारणीभूत असतात.

या अति जवळच्यांना ‘चहा पेक्षा किटली गरम’ म्हणून ओळखले जाते. एक वेळ नेत्याला जे माहीत नसते किंवा नेत्याच्या जे मनात नसते, ते हे जवळचे दहा-पंधरा जण त्यांच्या मनात भरवत असतात. ‘साहेब, तो अलीकडे तिकडे जास्त संपर्कात असतो,’ असे एखादे वाक्य तो बरोबर महत्त्वाच्या क्षणी मुद्दाम बोलून जातो. ‘साहेब, ते दोघे परवा एका गाडीवरून फिरत होते,’ असे सांगून दुसरा चहापेक्षा किटली गरम कार्यकर्ता त्यात आणखी भर घालतो आणि निष्कारण संशयाचे वातावरण निर्माण करतो. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ गावातल्या सर्वांनाच झाला आहे. त्यामुळे ज्या गावात मते कमी पडली व ज्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबात लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला आहे, त्यांच्यावर नेते संशय व्यक्त करत आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना निष्कारण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कोल्हापुरातल्या काही नेत्यांनी किमान पाच-सहा वेळा पक्ष बदलला आहे. निवडणूक उमेदवारी जाहीर होण्याच्या काळात तर 15 दिवसांत तीन पक्ष बदललेला एक नेता कोल्हापूर जिह्यात आहे. पण हे नेते मोठे असल्याने त्यांनी इकडून तिकडे केले तर त्याला ‘दूरदृष्टीचा नेता’ म्हणून विशेषण लावले जात आहे. सामान्य कार्यकर्त्याने असे केले तर मात्र त्याला गद्दार म्हणून ओळखले जात आहे. त्याची किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्याची लगेच बदली केली जात आहे. थकीत वसुली लावली जात आहे. एखादी पेंडिंग केस पुन्हा उघडली जात आहे. त्याला संधी मिळेल, तेथे अपमानित केले जात आहे. आपण किती वेळा पक्ष बदलला, गट बदलला, गुपचूप तडजोडी केल्या, हे नेता सोयीस्कर विसरतो. मात्र कार्यकर्ता आपल्याशीच एकनिष्ठ राहिला पाहिजे, असाच त्याचा आग्रह असतो. जवळच्या चहा पेक्षा किटली गरम टाईप घोळक्यातला कोणी ना कोणी त्यात कायम भर टाकतच असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांना कायम गटातच बांधून राहावे लागते. पटत नसले तरी मान हलवावी लागते, हे वास्तव आहे. ही परिस्थिती बदलली तरच राजकारण स्वच्छ व निर्भय होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article