तर हा माझा सन्मान...अजित पवारांच्या आव्हानानंतर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया
2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या विद्यमान खासदाराचा पराभव करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे बोलून दाखवल्यावर शिरूर मतदार संघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेतली.
माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांनी दिलेले आव्हान आपण स्विकारले असल्याचे जाहीर केले. तसेच 27 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या शेतकरी जनआक्रोश यात्रेला 30 डिसेंबर रोजी संबोधित करून त्याची समाप्ती करतील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शिरूरचे आमदार अमोल कोल्हे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बाजू घेतली. त्यामुळे अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे हे नेहमीच महायुतीच्या निशाण्यावर आहेत. आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी शिरूरची जागा लढवणार असल्याचे जाहीर करून अमोल कोल्हे यांना जाहीर आव्हान दिले.
त्यानंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेऊन राजकिय चर्चा केली. अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा केली का, असे विचारला असता खासदार कोल्हे म्हणाले, “देशात लोकशाही आहे आणि त्यात प्रत्येकाला आपली सर्व ताकद दाखवण्याचा अधिकार आहे. पण निर्णय जनता देत असते. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. निवडणूक ही लोकशाही प्रक्रिया आहे असून कोणीही प्रतिस्पर्धी उमेदवार असू शकतो." असे त्यांनी आपले मत मांडले.
पुढे बोलताना ते म्हणाले, "मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. अजित पवार यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याने मला आव्हान दिले असेल तर तो मी माझा सन्मान मानतो. अजित पवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि मी खूप लहान आहे, त्यांच्या विधानावर प्रतिवाद करणे मला शोभत नाही." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.