For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार

04:47 PM Feb 18, 2026 IST | अनुजा कुडतरकर
तर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार
Advertisement

राजू शेट्टींचा शासनाला इशारा; आंबा बागायतदार अस्मानी संकटात ; कर्जमाफी आणि हेक्टरी ५ लाखाची मदत द्या

Advertisement

देवगड ( प्रतिनिधी)

कोकणचा आंबा उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटात सापडला असून राज्य सरकारने तातडीने या शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी व हेक्टरी ५ लाख रूपये मदतीचा हात येत्या बजेटच्या अर्थसंकल्पात न दिल्यास १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी देवगड येथे घेण्यात आलेल्या आंबा उत्पादक शेतक-यांच्या एल्गार मेळाव्यात व्यक्त केली. आंबा उत्पादक , काजू उत्पादक व मत्स्य शेतकरी हा कोकणचा कणा आहे. कोकणातील हे तीनही मुख्य शेतकरी सध्या संकटात आहे .चालू वर्षीचा आंबा हंगाम मोहोर गळती , अवकाळी पाऊस, तापमानातील चढ उतार , फळमाशीचा प्रादुर्भाव, वाढता किटकनाशकांचा खर्च या सर्व घटकामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आंबा संशोधन , कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ मधील शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र राज्यातील कृषी , फलोत्पादन , मत्स्य विभागाने सर्व उपाययोजना कागदावर केलेल्या आहेत.कोकणचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आणि राज्यातील इतर आंबा उत्पादक शेतकरी सध्या नैसर्गिक अस्मानी व सुल्तानी संकटात सापडले आहेत. बदलत्या हवामानामुळे तुडतुडे , फळमाशी आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हवामान बदलाचा आंबा पिकाला मोठा फटका बसला असून, देवगड आणि इतर भागात मोहोर करपल्याने उत्पादनात ९० टक्क्यांहून अधिक घटले आहे.यामुळे राज्य सरकारने तातडीने आंबा उत्पादक शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी करावी किंवा हेक्टरी ५ लाख रूपयाची नुकसानभरपाई आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावी. किटकनाशके व बुरशीनाशक औषध कंपन्यांची कृषी विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. तसेच यापुढील संकट टाळण्यासाठी देवगड याठिकाणी अद्यावत आंबा संशोधन केंद्र उभारणे व आंबा बागायतदार यांना अल्प दरात व मुळ किमतीत औषधे , खते व किटकनाशके यांचा पुरवठा करणे , AI तंत्रज्ञानाचा वापर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावा. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी या एल्गार मेळाव्यात केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.