महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

... तर वेलिंगकरांच्या अटकेची गरज नाही

12:33 PM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई उच्च न्यायालयाचा पोलिसांना आदेश : वेलिंगकरांना पोलिसात हजर राहण्याचे निर्देश

Advertisement

पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल मागील सुमारे एक आठवडा वादाचे केंद्र बनलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा प्रमुख तथा हिंदू रक्षा महाआघाडीचे गोवा राज्य समन्वयक प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांना काल गुरुवारी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देताना, जर ते तपासात सहकार्य करत असतील, तर अटक करण्याची गरज नसल्याचा आदेश पोलिसांना दिला आणि वेलिंगकर यांना शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता डिचोली पोलिसस्थानकात हजर राहण्यास सांगितले. वेलिंगकर यांची याचिका गुऊवारी सकाळी 10.40 वाजता न्या. भरत देशपांडे यांच्यासमोर सुनावणीसाठी आली. सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या हा खटला ऐकण्यासाठी कोर्टरूम हिंदुप्रेमी, वेलिंगकर यांचे समर्थक आणि वकिलांनी पूर्ण भरले होते. सुनावणीवेळी भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम-35 वर दोन्ही बाजूनी जोरदार युक्तिवाद करण्यात आले.

Advertisement

एकही नोटिस मिळाली नाही 

वेलिंगकर यांचे वकील सरेश लोटलीकर यांनी 4 ऑक्टोबरला वेलिंगकर यांच्यावर एफआयआर नोंद झाली असली तरी आजपर्यंत पोलिसांची एकही नोटिस मिळाली नसल्याचा दावा केला. पोलिसांनी पहिली नोटिस वेलिंगकर यांच्या घराच्या दारावर चिकटवून अवघ्या तासात चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले. ज्या दिवशी वेलिंगकर यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, त्याचदिवशी दुसरी नोटिस पाठवण्यात आली. तिसऱ्या नोटिशीत शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता डिचोली पोलिसस्थानकात हजर राहण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अटकेसाठी नव्हे, चौकशीसाठी बोलविले

अॅड. लोटलीकर यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम-35 अंतर्गत संशयिताला पोलिस चौकशीसाठी पाचारण करतात त्यावेळी संशयिताला अटक करण्याची गरज भासत नसल्याचे नमूद केले. न्यायाधीशांनी यावर सरकारी वकिलाकडे स्पष्टीकरण मागितले असता, संशयिताला फक्त चौकशीसाठी बोलावले असून अटक करण्यासाठी बोलावले नसल्याचे सांगितले.

तपासात पूर्ण सहकार्य करणार 

वेलिंगकर यांची तपासकामात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी आहे, मात्र त्यांना अटक  करु नये, अशी विनंती अॅड. लोटलीकर यांनी केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करून शुक्रवारी 5 वाजता वेलिंगकर यांनी डिचोली पोलिसस्थानकात हजर राहण्याचे आणि ते तपासकामात मदत करत असतील तर त्यांना पोलिसांनी अटक करू नये. पोलिसांना यापुढेही ज्या-ज्या वेळी त्यांच्या उपस्थितीची गरज लागेल त्यावेळी वेलिंगकर हजर राहतील, असा आदेश न्यायालयाने दिला.

 हस्तक्षेप याचिकांवर 15 रोजी सुनावणी

दरम्यान या प्रकरणात ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा, माजी मंत्री चर्चिल आलेमाव, वोरेन आलेमाव आणि  झिना परेरा या चार जणांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. आणखीही काही जणांनी हस्तक्षेप याचिका सादर करण्याची विनंती केली असता त्यांना न्यायाधीशांनी मोकळीक दिली. आव्हान याचिकांव सुनावणी येत्या मंगळवार 15 रोजी  घेण्यात येणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या. देशपांडे यांनी जाहीर केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article