लंका जळू नये म्हणून
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने मध्यपूर्वेच्या शांततेला धक्का बसला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर इराणने 4 मार्चपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीचा रस्ता बंद केला, टँकरवर हल्ले केले आणि युद्धाची आग पेटली. याच पार्श्वभूमीवर 29 मार्च 2026 रोजी अमेरिकन अर्थतज्ञ जेफ्री सॅक्स यांनी संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) स्पष्ट इशारा दिला आहे. “दुबई आणि अबू धाबी उद्ध्वस्त होतील,” असे ते म्हणाले. “मुळात, जर यूएई या युद्धात उतरले तर दुबई आणि अबूधाबी उडवून दिले जाऊ शकतात. ही रिसॉर्ट्सची ठिकाणे, पर्यटन स्थळे आहेत. ही काही तटबंदी असलेली मिसाईल डिफेन्स क्षेत्रे नाहीत. ही अशी ठिकाणे आहेत जिथे श्रीमंत लोक पार्ट्या करण्यासाठी आणि पैसा गुंतवण्यासाठी जातात,” असे सॅक्स यांनी एएनआयशी बोलताना स्पष्ट केले. अब्राहम अॅकॉर्ड्सनुसार अमेरिकेची बाजू घेणे ही यूएईची मोठी चूक असल्याचेही त्यांनी सांगितले. “स्वत:च्या संरक्षणावर भर द्या, अमेरिकेवर अवलंबून राहू नका,” असा सल्ला त्यांनी दिला. ही घटना केवळ एक इशारा नाही, तर युद्धाच्या वाढत्या धोक्याची वास्तविकता दाखवणारी आहे. जेफ्री सॅक्स हे जगप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्रोफेसर आहेत. 1990 च्या दशकात त्यांनी पूर्व युरोप (पोलंड, बोलिव्हिया) मध्ये ‘शॉक थेरपी’ अर्थनीतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे काही देशांना संक्रमण काळात स्थिरता मिळाली, तर काही ठिकाणी आर्थिक असमतोल निर्माण झाला. पुढे ते संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय (मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स) चे प्रमुख सल्लागार झाले. इराक युद्ध, लीबिया हस्तक्षेप, युक्रेन संघर्ष यांवर त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची कडक टीका केली आहे. “अमेरिका जग चालवू शकत नाही, हे त्याचे फक्त अहंकाराचे धोरण आहे,” असे ते वारंवार सांगतात. युक्रेन युद्धासाठी नाटो विस्तार आणि 2014 च्या ‘कलर रेव्होल्यूशन’ला जबाबदार धरतात. त्यांच्या मतांमुळे विकसनशील देशांना आर्थिक सल्ला मिळाला, तर अमेरिकेच्या ‘अनंत युद्ध’ धोरणाला आव्हान मिळाले. आजचा इशारा त्यांच्या दीर्घकालीन शांतता आणि कूटनीतीच्या विचारसरणीशी सुसंगत आहे. दुबई आणि अबूधाबी ही शहरं जगातील प्रमुख पर्यटन केंद्रे आहेत. 2000 च्या दशकापासून तेलावर अवलंबून न राहता पर्यटन, वित्त आणि व्यापारावर आधारित अर्थव्यवस्था उभारण्यात यूएईने अभूतपूर्व यश मिळवले. 2019 मध्ये दुबईने 16.7 दशलक्ष पर्यटकांना आकर्षित केले होते; कोविडनंतरही ही संख्या 14 दशलक्षांवर पोहोचली आहे. 2026 पर्यंत यूएई पर्यटन क्षेत्र 237 अब्ज दिरहाम (सुमारे 65 अब्ज डॉलर) चे योगदान देईल, असे सरकारचे उद्दिष्ट आहे. लक्झरी हॉटेल्स, बिझनेस हब, एक्स्पो सिटी, सस्टेनेबल टुरिझम प्रकल्प येथे जगभरातील श्रीमंत पर्यटक, गुंतवणूकदार येतात. मध्यपूर्वेतील ही ‘रिसॉर्ट एरिया’ युद्धाच्या छायेत आल्यास केवळ स्थानिक नव्हे तर जगभरातील पर्यटन उद्योग, विमान कंपन्या, शॉपिंग मॉल्स आणि अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसतो. इतिहास सांगतो की, शांततेच्या काळातच या शहरांनी वाळवंटातून स्वर्ग निर्माण केला, युद्धाने तो नष्ट होण्याची भीती आहे. गेल्या एक महिन्यात (28 फेब्रुवारीपासून) इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाने जगाला मोठा फटका बसला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने जगातील 20 टक्के तेल आणि
गॅस पुरवठा ठप्प झाला. ब्रेंट क्रूडचे भाव 70 डॉलरवरून 100-120 डॉलरपर्यंत गेले. युरोप, आशिया येथे इंधन महागले, महागाई वाढली. शिपिंग आणि एअर ट्रान्सपोर्ट व्यत्यय आला. खाद्यपदार्थ, खतांचा पुरवठा बिघडला. जागतिक पुनरुत्थान धोक्यात आले. अमेरिका-युरोपमध्ये गॅसोलीन भाव वाढले, उद्योगांच्या किंमती वाढल्या. आशियातील विकासक देशांना भारतासह ऊर्जा संकटाने आर्थिक मंदीचा धोका निर्माण झाला. युद्ध केवळ मध्यपूर्वपुरते मर्यादित नाही; ते जागतिक अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या तोडत आहे. जेफ्री
सॅक्स यांच्या या स्पष्ट मतांचे कौतुक करणे आवश्यक आहे. ते केवळ अर्थशास्त्रज्ञ नाहीत, तर मानवी कल्याण आणि शांततेचे पुरस्कर्ते आहेत. युद्धाच्या आर्थिक आणि मानवी खर्चाची ते नेहमी आठवण करतात. त्यांचा इशारा यूएईसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी आहे. युद्धात सामील होणे म्हणजे स्वत:च्या समृद्धीला आग लावणे. त्यांच्या पूर्वीच्या मतांनी विकसनशील देशांना मार्गदर्शन केले आणि अमेरिकेच्या एकतर्फी धोरणाला आव्हान दिले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन्ही कालखंडात युद्ध आणि तणाव वाढले. पहिल्या टर्ममध्ये अब्राहम अॅकॉर्ड्सने काही शांतता दिसली, पण इराणी जनरल सुलेमानींच्या हत्येने तणाव वाढला. आता दुसऱ्या टर्ममध्ये इराणविरोधात प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले. यामुळे जगाला इंधन संकट, महागाई आणि अनिश्चितता सोसावी लागली. ट्रम्प युगात ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाने मध्यपूर्वेत अस्थिरता निर्माण केली. युद्धे केवळ विजय देत नाहीत, तर दीर्घकालीन त्रास देतात. शरणार्थी, आर्थिक मंदी आणि नवीन संघर्ष निर्माण करतात. जगातील पूर्वीच्या लढाया याच गोष्टी सांगतात. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात लाखो लोक मारले गेले, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्या. त्यानंतर लीग ऑफ नेशन्स आणि संयुक्त राष्ट्र संघ स्थापन झाले. शांतता करार, कूटनीती, आंतरराष्ट्रीय कायदे यांचा प्रयत्न सुरू झाला. तरीही व्हिएतनाम, इराक, अफगाणिस्तानसारख्या युद्धांनी जगाला शिकवले की, युद्ध हा कधीच शाश्वत उपाय नसतो. आजही शांततेसाठी संवाद, समझोता आणि बहुपक्षीय कूटनीती हाच मार्ग आहे. या सर्वाचा विचार करता, ‘लंका जळू नये म्हणून’ त्या देशांनी सजग व्हायला हवे. दुबई-अबूधाबीसारख्या समृद्ध शहरांना युद्धाची आग लागू नये, यासाठी कूटनीतीने मार्ग काढला पाहिजे. जेफ्री सॅक्स यांच्यासारख्यांचा आवाज ऐकून जगाने युद्धाच्या वेडापासून दूर राहिले पाहिजे. शांतता हाच खरा विकासाचा मार्ग आहे. युद्धाने कोणताही विजेता होत नाही. अमेरिकेच्या नादी लागलेल्या जगाला यापूर्वी अनेक फटके बसलेले आहेत. अफगाणिस्तानमध्ये हात दाखवून अवलक्षण करणाऱ्या त्यांच्या धोरणाने सत्तांतर घडले. अमेरिकेच्या जीवावर असलेल्या तिथल्या जनतेला वाऱ्यावर सोडून त्यांच्या लष्कराने पळ काढला. जगाने हे डोळ्यांनी पाहिले आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात आपण युक्रेनच्या मागे आहोत असे अनेकदा सांगून अखेरीस पुरता युक्रेन उध्वस्त होईपर्यंत अमेरिकेने बघ्याची भूमिका घेतली. इस्रायलच्या सध्याच्या कृतीबद्दल त्यांना आज काय वाटते त्यापेक्षा भविष्यात ते त्यांची बाजू सांभाळू शकतील का हा प्रश्नच आहे.