For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

..तर राहुल गांधींनी एक पाऊल मागे घ्यावे!

06:10 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
  तर राहुल गांधींनी एक पाऊल मागे घ्यावे
Advertisement

प्रशांत किशोर यांचा काँग्रेस नेत्याला विश्रांती घेण्याचा सल्ला

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

प्रख्यात निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला काही सूचना केल्या आहेत. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यास राहुल गांधी यांनी स्वत:चे पाऊल मागे घेण्याबद्दल विचार करावा. राहुल हेच खऱ्या अर्थाने पक्ष चालवत आहेत. मागील 10 वर्षांमध्ये अपेक्षित कामगिरी करता न आली तरीही ते मार्गातून बाजूला होत नाहीत आणि अन्य कुणाला पुढे येऊ देत नाहीत. माझ्यानुसार हा प्रकार लोकशाहीच्या विरोधात आहे असे उद्गार प्रशांत किशोर यांनी काढले आहेत.

Advertisement

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी राजकारणापासू दूर राहणे आणि 1991 मध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांनी कार्यभार सांभाळण्याच्या घटनेचा उल्लेख प्रशांत किशोर यांनी केला आहे. जेव्हा तुम्ही एकच काम मागील 10 वर्षांपासून करत आहात आणि यश मिळत नसेल तर एक ब्रेक घेण्यात काहीच कमीपणा नाही. जगभरातील प्रभावी नेते हे स्वत:मधील कमतरता ओळखतात आणि ते सक्रीय स्वरुपात ही कमतरता भरून काढण्यासाठी तत्पर असतात असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

सर्वकाही जाणत असल्याची भावना

राहुल गांधी यांना आपण सर्वकाही जाणतो असे वाटते. तुम्हाला कुणाच्या मदतीची आवश्यकता नाही असे वाटत असल्यास कुणीच मदत करू शकत नाही. राहुल गांधी हे स्वत:ला योग्य आणि स्वत:च्या विचारांना मूर्त रुप देणाऱ्या व्यक्तीची गरज असल्याचे मानतात. परंतु हे शक्य नाही असे प्रशांत यांनी नमूद केले आहे. 2019 च्या निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासंबंधीच्या राहुल गांधी यांच्या निर्णयाचा त्यांनी दाखला दिला. वायनाड मतदारसंघाच्या खासदाराने तेव्हा आपण मागे हटून अन्य कुणाला जबाबदारी सोपविणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु प्रत्यक्षात ते या घोषणेच्या उलट काम करत आहेत असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.

पक्षात कुणीही निर्णय घेऊ शकत नाही हे काँग्रेसचे अनेक नेते खासगीत मान्य करतील. आघाडीतील सहकाऱ्यांसोबत जागावाटप करण्याविषयी ‘एक्सवायझेड’कडून मंजुरी मिळत नाही तोवर हे नेते कुठलाच निर्णय घेऊ शकत नाहीत. राहुल गांधी यांनी जे निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा इतरांची असते, ते निर्णय ते घेतच नाहीत असे काँग्रेस नेत्यांचा एक गट खासगीत सांगतो. काँग्रेस आणि त्याच्या समर्थकांनी वारंवार अपेक्षित परिणाम न मिळून देखील राहुल गांधी हे पक्षासाठी उपयुक्त ठरतील या धारणेवर ठाम राहू नये असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

काँग्रेसची पिछेहाट

राहुल गांधी हे निवडणूक आयोग, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमांमुळे पक्षाला निवडणुकीत अपयश मिळाल्याचा दावा करतात. हे आंशिक स्वरुपात सत्य असू शकते, परंतु पूर्ण सत्य नाही. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागांची संख्या 206 वरून कमी होत 44 झाली होती. त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेवर होता आणि भाजपचा विविध संस्थांवर अत्यंत कमी प्रभाव होता. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कामकाजात संरचनात्मक त्रुटी आहेत. स्वत:च्या यशासाठी काँग्रेसने या त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. काँग्रेसला केवळ एक पक्ष म्हणून पाहिले जाऊ ये. देशात याचे अस्तित्व कधीच संपविता येणार नाही. काँग्रेसने स्वत:च्या इतिहासात अनेकदा उभारी घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

घराणेशाही अन् काँग्रेस

घराणेशाहीचा मुद्दा लोकांमध्ये चर्चेत आहे. कुठल्याही आडनावामुळे नेते होणे स्वातंत्र्यानंतरच्या काळात एक फायदा असायचा. परंतु आता हा एक भार आहे. राहुल गांधी, अखिलेश यादव किंवा तेजस्वी यादव यांना त्यांच्या पक्षांनी नेता म्हणून स्वीकारले असेल, परंतु लोकांनी नाही. अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाला विजय मिळवून देण्यास सक्षम आहेत का असा सवाल प्रशांत किशोर यांनी उपस्थित केला.

Advertisement
Tags :

.