महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

...तर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीबाबत प्रश्नचिन्ह

06:18 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची सोडलेली साथ प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी एकला चलोचा दिलेला नारा त्यामुळे इंडिया आघाडीला एकामागून एक धक्के बसलेले असताना इंडिया आघाडीचे प्रमुख नेते असलेल्या महाराष्ट्रात आता कोणता भूकंप होणार हे बघावे लागणार आहे. इंडिया आघाडीचे भवितव्य अधांतरी असून इंडिया आघाडीच्या पडझडीचे परिणाम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर होणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि भाजपने प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षांबाबत घेतलेली भूमिका, भाजपचा वाढता प्रभाव याविरोधात एका पक्षाने भाजप विरोधात लढणे अशक्य असल्याने राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीची भाजप विरोधी नेत्यांनी स्थापना केली, या आघाडीची पहिली बैठक याच इंडिया आघाडीचे शिल्पकार असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बिहारमध्ये झाली. मात्र त्याच नितीश कुमार यांनी रविवारी भाजपसोबत जात इंडिया आघाडीला जोरदार धक्का दिला.

Advertisement

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीसह न जाता एकला चलो रे चा दिलेला नारा आणि आपने काँग्रेस विरोधात घेतलेली भूमिका बघता इंडिया आघाडीचे सध्याचे भवितव्य हे अधांतरीच असल्याचे दिसत आहे. ज्यांनी या आघाडीसाठी पुढाकार घेतला तेच आता या आघाडीतून काढता पाय घ्यायला लागले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना केली. त्याच धर्तीवर राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचा जन्म झाला म्हटला तर वावगे ठरणार नाही. मात्र काँग्रेस प्रणीत असणाऱ्या याच आघाडीतील त्या त्या राज्यात असणाऱ्या प्रादेशिक पक्षांसोबत काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचा समन्वय नसल्याने अनेक प्रादेशिक पक्ष हे इंडिया आघाडीसोबत न जाता स्वतंत्र भूमिका घेताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील गेल्या चार वर्षातील राजकारणाचा विचार केला तर महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यामध्ये फुट पाडण्यास भाजप यशस्वी झाली.

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर राज्यात काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेचा समान वाटा घेतला, मात्र ज्या वेळी महाविकास आघाडी सरकार गेले आणि शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यावेळी या दोघांशी लढताना मात्र काँग्रेसची भूमिका ही नेहमीच नरो वा कुंज रोवा अशीच पहायला मिळाली. गेल्या चार वर्षात सर्वाधिक फायदा हा काँग्रेसचा झाला मग त्या विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका असो किंवा कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेसचे विधानपरिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहातील संख्याबळ वाढले. पदवीधर निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला गेलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसने अधिकृत उमेदवारी देऊनही सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही मुळातच ते आपल्या मुलासाठी म्हणजेच सत्यजित तांबेंसाठी आग्रही होते. पण काँग्रेसच्या काही नेत्यांच्या भूमिकेमुळे अखेर येथे तांबे यांनी काँग्रेस नेत्यांनाच अस्मान दाखवत मुलाला भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आणले तर या जागेवर ऐनवेळी शिवसेना पुरस्कृत शुभांगी पाटील लढल्या आणि त्यांचा पराभव झाला. तिकडे कोल्हापुरात सतेज पाटील बिनविरोध निवडून गेले, त्यामुळे काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याने गेल्या चार वर्षात भाजपला अंगावर घेतले नसल्याचे दिसते. सत्ता उपभोगताना किमान समान कार्यक्रमाची आठवण कऊन द्यायची हाच काँग्रेसचा महाराष्ट्रात गेल्या चार वर्षातील कार्यक्रम राहिला. राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची मते फुटणे, विधानपरिषद निवडणुकीत पहिल्या पसंतीचे उमेदवार असणाऱ्या चंद्रकांत हंडोरे ऐवजी भाई जगताप यांचा विजय होणे आणि उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या विश्वासदर्शक चाचणीच्या वेळी काँग्रेसचे तब्बल 11 आमदार गैरहजर राहणे असो केवळ कारणे दाखवा नोटीस देणे आणि चौकशी समित्या नेमणे आणि दिल्लीतून प्रसिध्दीपत्रक काढणे यातून अद्याप काँग्रेस बाहेर आलेली नाही.

महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या रडारवर केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीची मंडळी आली. संजय राऊत आणि अनिल देशमुख, नवाब मलिक तर जेलमध्ये जाऊन आले. अनेकांच्या चौकशा झाल्या मात्र यात काँग्रेसचा कोणीच नव्हता याचे आश्चर्य अपवाद सुनिल केदार यांची गेल्या महिन्यात आमदारकी रद्द करण्यात आल्याचा. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेमुळेच आता भूमिका काँग्रेस सोबत राहण्याबाबत मित्रपक्ष विचार करू लागले आहेत. राहुल गांधी भारत जोडो तसेच इतर देशव्यापी कार्यक्रमातून पक्षाचा जनाधार वाढविण्याचे काम करत असताना स्थानिक पातळीवर देखील नेत्यांनी समन्वय साधला पाहिजे तो होताना दिसत नसल्याने काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने या जागेसाठी निवडणूकच घेतली नाही. संग्राम थोपटे यांना या जागेसाठी निवडून पाठविले असते तर राज्यात सत्तांतर होण्याच्या नाट्याला लगाम बसला असता मात्र काँग्रेसच्या अंर्तगत लाथाळ्यानेच आता काँग्रेस संपत चालली आहे. राज्यात 48 पैकी एक खासदार असलेला काँग्रेस मात्र जागावाटपात बरोबरीची भाषा करतो. कर्नाटक निवडणुकीनंतर तर राज्यातील नेत्यांनी अशा बेटकुळ्या फुगविल्या की जणू काय महाराष्ट्रातच काँग्रेसची स्वबळावर सत्ता आली.

मुंबई महापालिका स्वबळावर लढवू, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवू अशा घोषणा करण्यात मात्र काँग्रेस नेते आघाडीवर होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतही राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतलेली भूमिका बघता इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी घेतल्यास महाराष्ट्रातही इंडिया आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आलेल्या डावे, समाजवादी आणि जनता दल काँग्रेसला दूर ठेवत इंडिया आघाडी म्हणून नव्हे तर महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढतील का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article