...तर भाजपची राज्यपालांकडे धाव
बेंगळूर : राज्यात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस सरकारमध्ये गोंधळ सुरुच आहे. या गोंधळाचे लवकर निराकरण न झाल्यास विरोधी पक्ष भाजपने राज्यपालांकडे तक्रार करण्याची तयारी चालविली आहे. सत्ताधारी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षामुळे प्रशासकीय कामकाजाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप भाजपने केला आहे. कार्यकारी मंडळाचे प्रमुख असणाऱ्या राज्यपालांनी हस्तक्षेप करून राज्य सरकारला योग्य निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात येणार असून भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक, चलवादी नारायणस्वामी यांच्यासह आमदार, विधानपरिषद सदस्य व भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ पुढील दोन-तीन दिवसांत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
मागील दहा दिवसांपासून मुख्यमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे. जनतेच्या समस्या जाणून घेणारे कोणीच नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. बेंगळूरसारख्या ठिकाणी दिवसा दरोडे पडत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातच अधिकारासाठी संघर्ष आहे. मंत्र्यांना जबाबदारीचा विसर पडला आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांचा हस्तक्षेप आवश्यक आहे, अशी विनंती भाजपकडून राज्यपालांकडे केली जाण्याची शक्यता आहे.