स्नेहम कारखाना भीषण आगीत खाक
कोट्यावधी रुपयांचे मोठे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आगीची दुर्घटना : तिघे कामगार किरकोळ जखमी
वार्ताहर/किणये
नावगे क्रॉस जवळील ‘स्नेहम’ इंटरनॅशनल कारखान्याला मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमुळे एकच खळबळ उडाली. शार्टसर्किटमुळे आगीचा भडका उडाला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत होते, मात्र त्यांना मध्यरात्रीपर्यंत आग आटोक्यात आणता आली नाही. अग्निशमन दलाच्या सर्व वाहनांसह इतर खासगी टँकरांचा आधार घेण्यात आला. मात्र आगीचे रौद्ररुप पाहता त्याच्यासमोर सारेच हतबल झाले. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या आगीत तिघे कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून रणजीत दशरथ पाटील (वय 39, रा. बहाद्दरवाडी), यल्लाप्पा प्रकाश साळगुडे (वय 35, रा. जुने बेळगाव), मारुती नारायण कार्वेकर (वय 32, रा. कावळेवाडी, ता. बेळगाव) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
शॉर्टसर्किटमुळे आग
बेळगाव चोर्ला रस्त्यावरील नावगे क्रॉसजवळील मालु ग्रुपच्या पाठीमागील बाजूला स्नेहम इंटरनॅशनल हा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये तीन शिफ्टमध्ये कामगार काम करत असतात. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटने धुर येऊ लागला. त्यानंतर कामगारांच्या लक्षात येताच तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र भडका उडाल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. आग आटोक्यात येत नाही हे पाहताच सारे कामगार बाहेर पडले. त्यानंतर याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आला. प्रारंभी अग्निशमन दलाचा एकच बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे स्वरुप पाहता जितकी वाहने आहेत ती सर्व वाहने घटनास्थळी दाखल करावी, अशी सूचना करण्यात आली. मात्र त्या बंबमधील पाणीही काही वेळातच संपले. फवारणीचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. अक्षरश: थरकाप उडविणारी ही आग असल्यामुळे इतर कारखानदारांनीही आपल्याकडे असलेली पाण्याचे टँकर तसेच खासगी टँकर देखील दाखल करण्यात आले. मात्र आगीसमोर सारेच हतबल झाले.
पोलीस फौजफाटाही घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती पोलीस खात्याला समजल्यानंतर पोलीस फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला. स्वत: पोलीस आयुक्त एडा मार्टिन मार्बनिंग, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश हे देखील दाखल झाले. कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. त्यांना पिटाळण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. आगीची माहिती हेस्कॉम अधिकाऱ्यांनाही देण्यात आली. त्यानंतर यापरिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला. अंधारातच अग्निशमन दलाला तसेच पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. कारखान्यामध्ये कोणी आहे का, याची चाचपणी सुरू करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार रात्री 12 वाजेपर्यंत तर आत कोणी आहे की नाही, याची माहिती उपलब्ध झाली नाही.
जिल्हाधिकारी तातडीने दाखल
जिल्हाधिकारी महम्मद रोशन हे देखील स्वत: हजर झाले. तेही रात्री उशीरापर्यंत या ठिकाणी ठाण मांडून होते. अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेत होते. याचबरोबर तातडीने सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनालाही सूचना करण्यात आली. याचबरोबर कारखान्याच्या परिसरात 7 ते 8 रुग्णवाहिका देखील तैनात करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाकडून जी काही काळजी घ्यावयाची होती ती गांभीर्याने घेण्यात आली होती. बेळगाव पसिरात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारखान्याला आग लागण्याची पहिलीच घटना घडली आहे. पहाटेपर्यंत आग विझविण्यासाठी अग्निशमक दल शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
एनडीआरएफ पथकही दाखल
सध्या पूरपरिस्थितीमुळे बेळगावात एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आले होते. आगीच्या घटनेची माहिती त्यांना दिल्यानंतर तातडीने एनडीआरएफ पथकही घटनास्थळी दाखल झाले.
आपत्कालीन जनरेटर दिव्याची व्यवस्था
विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने परिसरात अंधार पडला होता. त्यामुळे अग्निशमन दलासह पोलिसांना देखील त्रास होत होता. प्रकाशासाठी तातडीने आपत्कालीन जनरेटर प्रखर दिव्यांची व्यवस्था अग्निशमन दलाने केली.
जीवाच्या आकांताने सर्व कर्मचारी बाहेर पळाले
काखान्याला आग लागल्याचे समजताच काम करत असलेल्या कर्मचारी जीवाच्या आकांताने जवळच असलेल्या खिडकीतून उडी माऊन तसेच दरवाजातून बाहेर पळाले. यामध्ये केवळ तीनच कामगार जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून सारे बचावले.
कामगारांच्या नातेवाईकांची कारखान्याकडे धाव
नावगे क्रॉसजवळ हा स्नेहम इंटरनॅशनल कारखाना झाल्यामुळे पश्चिम भागातल सुमारे 500 कामगारांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला. सदर कामगारांना ये-जा करण्यासाठी हा कारखाना कमी अंतरावर आहे. त्यामुळे या भागातील बरेच तरुण या कारखान्यात कामाला येतात. नावगे क्रॉस परिसरातील सदर कारखान्याला आग लागल्यामुळे आजुबाजूच्या गावातील नागरिक आपला मुलगा, भाऊ, कामावर गेला होता, तो सुखरुप आहे की नाही याच्यासाठी त्यांनी धावपळ केली. अक्षरश: अनेकांनी तर आपला मुलगा, भाऊ, नातेवाईक सुरक्षित आहेत की नाही हे पाहण्यासाठी कारखान्याकडे धाव घेतली. आपली व्यक्ती सुखरुप असल्यामुळे साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला होता. यावेळी महिला देखील मोठ्या संख्येने कारखान्याकडे आल्या होत्या. एकमेकांची विचारपूस केली जात होती.
आगीचे रौद्ररुप
कारखान्याला लागलेली आग इतकी भयानक होती की एक कि.मी. अंतरावरुन आगीचे लोळ दिसत होते. त्यामुळे आजुबाजूचे नागरिक कारखान्याकडे धावून आले. तसेच बेळगाव चोर्ला रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांनीही मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दृष्य पाहिले आणि बरीच वाहने रस्त्यावर थांबली. त्यामुळे नावगे क्रॉसपासून ते रणकुंडये क्रॉसपर्यंत वाहनांची गर्दी झाली.
पंचनाम्यानंतरच नुकसानीचा आकडा स्पष्ट होणार
या आगीमध्ये कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला असून कोट्यावधी रुपयांचे साहित्य तसेच इतर यंत्रसामुग्री जळाली आहे. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समजणे अवघड झाले आहे. सर्व माहिती उपलब्ध झाल्यानंतरच नेमके किती नुकसान झाले हे स्पष्ट होणार आहे.