कुडाळात दुकानात आलेल्या घोणस सापाला सर्पमित्र अनिल गावडेंनी केले जेरबंद
वार्ताहर/कुडाळ
कुडाळ शहरात भरवस्तीत सचिन मेस्त्री यांच्या सचिन फ्लॉवर्स दुकानात घोणस जातीच्या सापाला पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथील सर्पमित्र अनिल गावडे यांनी काल दुपारी मोठ्या शिताफिने जेरबंद केले. त्यामुळे भीतीने गाळण उडालेल्या सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. साधारण दोन-तीन फुट लांबीचा हा घोणस जातीचा साप होता. कुडाळ शहरात सचिन मेस्त्री यांचे सचिन फ्लॉवर नावाचे दुकान आहे. गेली अनेक वर्ष ते फुलांचा व्यवसाय करतात. मेस्त्री यांनी नेहमीप्रमाणे काल सकाळी दुकान उघडले. दुकानात नेहमीप्रमाणे ते काम करत होते. त्यांच्यासोबत त्यांचा सहकारी संजू मांजी होता. त्यावेळी संजू मांजी याला दुकानातील फ्रिजच्या ठिकाणी अचानक फुसफूस असा आवाज ऐकू येऊ लागला. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला. मात्र पुन्हा त्यांना तसाच आवाज येऊ लागला. त्यावेळी त्यांनी याबाबत मेस्त्री यांना कल्पना दिली. मेस्त्री यांनी त्याठिकाणी पाहणी केली असता. त्यांना वेटोळे घातलेले जनावर दिसले. भल्यामोठ्या घोणस जातीच्या सापाला पाहून त्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी सर्पमित्र अनिल गावडे यांना तात्काळ दूरध्वनी करून बोलावून घेतले. सर्पमित्र अनिल गावडे लागलीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या शिताफिने त्या घोणस जातीच्या सापाला बरणीमध्ये जेरबंद केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घोणस जातीच्या सापाला पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. दोन-तीन दिवस हा घोणस साप त्याठिकाणी असावा असे सर्पमित्र अनिल गावडे यांनी सांगितले.घोणस जातीच्या सापाला अतिविषारी समजले जाते. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून उब मिळविण्यासाठी उन्हात त्यांचा वावर असतो. शेणखताजवळच्या ऊबेला किंवा बाथरूमच्या पाईपमधून,दाराच्या फटीतुन ऊबदार घरात हे सर्प शिरण्याची शक्यता याकाळात जास्त असते.त्यामुळे या कालावधीत त्यांच्या बाहेर पडण्याने सर्पदंश होण्याच्या प्रमाणात विलक्षण वाढ होते. सर्पमित्र अनिल गावडे यांनी यापूर्वी अनेक सापांसह सरपटणाऱ्या जनावरांना जीवदान दिले आहे. सापांना पकडण्यात त्यांचा हातखंडा आहे.