स्मृती मानधनाकडे भारतीय संघाचे नेतृत्व
आयर्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा : नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांती :
वृत्तसंस्था/ मुंबई
आयर्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर आणि वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.
भारतीय महिला संघाला 10 जानेवारीपासून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. उभय संघांमधील पहिला सामना 10 जानेवारी रोजी राजकोट येथे होणार आहे. यानंतर दुसरा सामना 12 जानेवारीला आणि तिसरा आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला राजकोट येथे खेळवला जाईल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत स्मृती मानधना भारताची कर्णधार असेल. ती एक अनुभवी खेळाडू आहे आणि तिने अनेक प्रसंगी दमदार कामगिरी केली आहे. दीप्ती शर्मा टीम इंडियाची उपकर्णधार असेल, तिच्यासोबत प्रतिका रावल आणि हरलीन देओल यांनाही टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. हरलीन दमदार फलंदाजीत तरबेज आहे. नुकतेच तिने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले होते. याशिवाय, यष्टीरक्षक फलंदाज उमा छेत्री, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा आणि तनुजा कंवर या संघात आहेत. त्याचबरोबर अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्स आणि राघवी बिस्त यांनाही संधी मिळाली आहे.
हरमनप्रीत, रेणुकाला विश्रांती
नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रेणुका सिंग यांना विश्रांती दिली आहे. जेव्हा खेळाडू सतत खेळतात तेव्हा त्यांना दुखापत होण्याची शक्यता वाढते. या कारणास्तव, खेळाडूंना अनेकदा विश्रांती दिली जाते. मात्र, हरमनप्रीत आणि रेणुका यांच्या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही. बीसीसीआयने फक्त या दोघींना विश्रांती देण्याबाबत सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आयर्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -
स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, उमा छेत्री (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तीतास साधू, सायमा ठाकोर, सायली सातघरे.