स्मृती मानधना टी-20 मानांकनात तिसरी
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसी महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकनात भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या मानांकनातील तिचे स्थान एका अंकाने वधारले आहे.
आयसीसीच्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकनात स्मृती मानधनाने यापूर्वी अग्रस्थान कायम राखले आहे. तर आता टी-20 प्रकारात ती अग्रस्थान मिळविण्यासाठी झगडत आहे. इंग्लंड बरोबर सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मृती मानधनाने 62 चेंडूत 112 धावांची खेळी करत आपल्या संघाला 97 धावांनी विजय मिळवून दिला होता. तिने या खेळीमध्ये 3 षटकार आणि 15 चौकार ठोकले. संघाची नियमीत कर्णधार हरमनप्रित कौर पहिल्या सामन्यात खेळू न शकल्याने मानधनाकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. टी-20 प्रकारातील यजमान इंग्लंडचा हा सर्वात मोठा पराभव आहे.
टी-20 फलंदाजांच्या मानांकनात स्मृती मानधना 771 मानांकन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी 794 मानांकन गुणांसह पहिल्या तर विंडीजची हेली मॅथ्युज 774 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची शेफाली वर्मा 13 व्या स्थानावर तर हर्लिन देवोल 86 व्या स्थानावर आहे. टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत इंग्लंडची वेगवान गोलंदाज लॉरेन बेलने चौथे स्थान मिळविले आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तिने 3 गडी बाद केले होते. गोलंदाजांच्या मानांकन यादीत पाकची फिरकी गोलंदाज सादीया इक्बाल पहिल्या स्थानावर आहे. अष्टपैलुंच्या मानांकन यादीत सुने लूसने 31 वे स्थान मिळविले आहे.