For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहावी परीक्षेची सुरळीत सांगता

11:34 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
दहावी परीक्षेची सुरळीत सांगता
Advertisement

विद्यार्थ्यांकडून फटाके फोडून मोठ्या प्रमाणात जल्लोष : रंगांचीही उधळण : विद्यार्थी रिलॅक्स मूडमध्ये

Advertisement

बेळगाव : दहावी परीक्षेचा शेवटचा पेपर सुरळीतपणे पार पडल्याने विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून रंगांची उधळण करत विद्यार्थ्यांनी हा आनंद साजरा केला. मागील महिनाभरापासून अभ्यासाचा असणारा ताण कमी झाल्याने विद्यार्थी रिलॅक्स दिसून आले. पुढील दोन महिने मित्र-मैत्रिणींना भेटता येणार नसल्याने एकमेकांच्या हातावर आपली नावे लिहून मैत्रीचे बंध घट्ट करण्यात आले. 25 मार्चपासून राज्यात दहावीची परीक्षा सुरू झाली. परीक्षेदरम्यान स्थानिक सुट्या असल्याने दोन आठवडे परीक्षा चालली. यावर्षी शिक्षण विभागाने कॉपीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले होते. त्यामुळे परीक्षेदरम्यान कोठेही कॉपीचे प्रकार घडले नाहीत. त्याबरोबरच फ्लाईंग स्क्वॉड यांच्याकडूनही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या जात होत्या. शहरासोबत ग्रामीण भागातही यावर्षी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

परीक्षा संपताच रंगपंचमीचा जल्लोष

Advertisement

शनिवारी दहावीचा शेवटचा पेपर होता. द्वितीय भाषा पेपर असल्याने काही माध्यमांचा इंग्रजी तर काही माध्यमांचा कन्नड पेपर होता. इतर पेपरप्रमाणेच शनिवारीही विद्यार्थ्यांची तपासणी करूनच परीक्षा केंद्रांवर सोडले जात होते. पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांबाहेर जल्लोष केला. गुलाल उधळून आनंद साजरा केला. रंगपंचमीवेळी परीक्षा सुरू असल्याने रंगपंचमी साजरी करता आली नव्हती. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेरच रंगपंचमी करण्यात आली. तसेच काही परीक्षा केंद्रांबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

मध्यान्ह आहाराला थंडा प्रतिसाद

परीक्षार्थींसाठी सरकारी व अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह आहाराची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, एकूणच परीक्षेच्या कालावधीत मध्यान्ह आहार उपक्रमाला थंडा प्रतिसाद मिळाला. शहरी भागात तर क्वचित एखाद्या केंद्रावर विद्यार्थी मध्यान्ह आहार घेत असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात काही ठिकाणी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. परीक्षा केंद्र दूरवर असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मध्यान्ह आहार घेतला.

शेवटच्या पेपरला 376 विद्यार्थ्यांची दांडी

द्वितीय भाषा पेपरला बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 376 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. बेळगाव शहरातील 144, बेळगाव ग्रामीण 73, तर खानापूर येथे 20 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. एकूण 32,518 विद्यार्थ्यांनी द्वितीय भाषा विषयाचा पेपर दिला. बेळगाव व चिकोडी या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये दहावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडल्याचे जिल्हाशिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.