स्मिथ, ख्वाजाचा शतकी तडाखा
श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी : कांगारुंच्या पहिल्याच दिवशी 2 बाद 330 धावा, ट्रेव्हिस हेडचीही फटकेबाजी
वृत्तसंस्था/ गॅले, श्रीलंका
श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीचा दिवस कांगारुंनी गाजवला. उस्मान ख्वाजा व स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकी खेळीच्या जोरावर कांगारुंनी पहिल्या दिवशी 2 बाद 330 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्टीव्ह स्मिथ 104 आणि उस्मान ख्वाजाने 147 धावा करून नाबाद परतले. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड 57 तर मार्नस लॅबुशेन 20 धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे, या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने पहिली धाव घेताच कसोटीत 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा तर जगातील 15 वा फलंदाज ठरला आहे.
प्रारंभी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा या सलामीच्या जोडीने कर्णधार पॅट कमिन्सचा निर्णय योग्य ठरवला. दोघांनी 92 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी प्रभात जयसूर्याने मोडली. त्याने हेडला चंडिमलकरवी झेलबाद केले. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत बॅटने कहर केल्यानंतर हेडने आता श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला आहे. त्याने कसोटीत टी-20 शैलीत फटकेबाजी केली आणि फक्त 40 चेंडूत 57 धावा केल्या. या वादळी खेळीत त्याने 10 चौकार व 1 षटकार लगावला. हेडने फक्त 35 चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकून श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. लाबुशेनलाही फार मोठी खेळी साकारता आली नाही. तो 20 धावा काढून माघारी परतला.
ख्वाजा, स्मिथची शतके
हेड, लाबुशेन बाद झाल्यानंतर सलामीवीर उस्मान ख्वाजा व स्टीव्ह स्मिथ यांनी संघाला सावरले. या जोडीने एकेरी-दुहेरी धावांवर भर देत संघाचे त्रिशतक फलकावर लावले. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 195 धावांची भागीदारी साकारली. या दरम्यान, उस्मान ख्वाजाने शानदार शतकी खेळी साकारताना 210 चेंडूत 10 चौकार व 1 षटकारासह नाबाद 147 धावा केल्या. त्याला कर्णधार स्मिथने देखील उत्तम साथ देताना कसोटीतील 35 वे शतक पूर्ण केले. स्मिथने 188 चेंडूचा सामना करताना नाबाद 104 धावा केल्या. अर्थात, स्मिथने कसोटीतील 35 वे शतक साजरे करताना सुनील गावसकर, महेला जयवर्धने यांचा 34 शतकांचा विक्रम मागे टाकला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कांगारुंनी 81.1 षटकांत 2 गडी गमावत 330 धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 81.1 षटकांत 2 बाद 330 (उस्मान ख्वाजा खेळत आहे 147, ट्रेव्हिस हेड 57, लाबुशेन 20, स्मिथ खेळत आहे 104, जयसूर्या व वांडरसे प्रत्येकी एक बळी).
स्टीव्ह स्मिथ बनला दहा हजारी मनसबदार
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रभात जयसूर्याचा चेंडूवर एकेरी धाव घेत कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या. कसोटीत 10,000 धावा करणारा स्मिथ ऑस्ट्रेलियाचा चौथा आणि एकूण 15 वा फलंदाज ठरला. स्मिथने 115 व्या कसोटी सामन्यात ही मोठी कामगिरी केली. यासह स्मिथने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गजांचे मोठे विक्रम मोडीत काढले. दरम्यान, स्मिथच्या आधी सुनील गावसकर, अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस, महेला जयवर्धने, शिवनारायण चंद्रपॉल, कुमार संगकारा, अॅलिस्टर कुक, युनूस खान, जो रूट यांनी दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.
कसोटीत सर्वात जलद 10 हजार धावा करणारे खेळाडू (सामना)
ब्रायन लारा - 111 सामने
कुमार संगकारा - 115 सामने
स्टीव्ह स्मिथ - 115 सामने
युनूस खान - 116 सामने
रिकी पॉन्टिंग - 118 सामने
जो रूट - 118 सामने
राहुल द्रविड - 120 सामने
सचिन तेंडुलकर - 122 सामने.
10 हजार धावा करणारा चौथा ऑस्ट्रेलियन
कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा स्टीव्ह स्मिथ हा जगातील 15 वा फलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी माजी कर्णधार रिकी पाँटिंग (13,378 धावा), अॅलन बॉर्डर (11,174 धावा) आणि स्टीव्ह वॉ (10,927 धावा) यांनी ही कामगिरी केली आहे.