स्मिथ, ग्रीन यांच्या अर्धशतकांनी कांगारुंना सावरले
दुसरी क्रिकेट कसोटी : ऑस्ट्रेलियाला 254 धावांची आघाडी
वृत्तसंस्था/ सेंट जॉर्ज
दुसऱ्या क्रिकेट कसोटीतील खेळाच्या तिसऱ्या दिवसा अखेर स्टिव्ह स्मिथ आणि कॅमेरुन ग्रीन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने यजमान विंडीजवर 254 धावांची आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकून आघाडी घेतली आहे.
या दुसऱ्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 286 धावांवर आटोपला. पावसामुळे पहिल्या दिवशीचा खेळ लवकर थांबविण्यात आला होता. वेबस्टर आणि कॅरे यांनी अर्धशतके नोंदवली. विंडीजच्या अल्झारी जोसेफने 4 तर सेल्सने 2 गडी बाद केले. खेळाच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने विंडीजला पहिल्या डावात 253 धावांवर रोखले. ब्रेंडॉन किंगने 75 तर कॅम्पबेलने 40 तसेच अल्झारी जोसेफने 27 आणि शमार जोसेफने 29 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे लिऑनने 3 तर हॅझलवूड आणि कमिन्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. स्टार्क, वेबस्टर व हेड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 बाद 12 धावा जमविल्या होत्या. या कसोटीतील खेळाच्या दुसऱ्या दिवशी गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना 12 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात विंडीजवर 33 धावांची आघाडी घेतली होती.
ऑस्ट्रेलियाने 2 बाद 12 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. पण नाईट वॉचमन लिऑन अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर 8 धावांवर झेलबाद झाला. कॅमेरुन ग्रीन आणि स्मिथ यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 93 धावांची भागिदारी केली. ग्रीनने 123 चेंडूत 52 धावा जमविल्या. स्मिथने 119 चेंडूत 71 धावांचे योगदान दिले. हेडने 39 तर वेबस्टरने 2 धावा केल्या. अॅलेक्स कॅरे 26 तर कर्णधार कमिन्स 4 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाने खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर विंडीजवर 254 धावांची आघाडी मिळवली. विंडीजतर्फे शमार जोसेफ, सेल्स आणि ग्रीव्हेस यांनी प्रत्येकी 2 तर अल्झारी जोसेफने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया प. डाव 286, विंडीज प. डाव 253, ऑस्ट्रेलिया दु. डाव 64.3 षटकात 7 बाद 221 (कॅमेरुन ग्रीन 52, स्मिथ 71, हेड 39, कॅरे खेळत आहे 26, अवांतर 17, ग्रीव्हेस, सेल्स, शमार जोसेफ प्रत्येकी 2 बळी, अल्झारी जोसेफ 1-42).