स्मिता नाईक यांच्या ‘ दिपज्योती नमोस्तुते ‘ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
न्हावेली / वार्ताहर
तळवडे केंद्रप्रमुख सौ.स्मिता रविंद्र नाईक यांच्या ‘ दिपज्योती नमोस्तुते ‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार २९ जून रोजी सकाळी १० वाजता पोपकर हॅाल भटवाडी माजगाव सावंतवाडी येथे होणार आहे.या पुस्तकामध्ये सौ.नाईक यांनी आपले ३८ वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव व या शिक्षण सेवेच्या कालावधीत आपणाला आयुष्यात काय मिळाले आणि आपण काय गमावले.याबाबत लिखाण केले आहे.सरकारी नोकरी म्हणजे केवळ पगार नाही तर अनुभव ,समाधान आणि माणसे मिळण्याची संधी असते.हे पुस्तक म्हणजे केवळ माझ्या आठवणी नाही तर माझ्या मनात घर करुन राहिलेल्या असंख्य माणसांची भावनिक भेट आहे . या आठवणी मी शब्दरुपात व्यक्त केल्याचे सौ.स्मिता नाईक यांनी म्हटले आहे.सौ.स्मिता नाईक या जिल्हा परिषद शाळेमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदी १५ वर्ष कार्यरत असून केंद्रप्रमुख म्हणून त्यांना एप्रिल २०२५ मध्ये बढती मिळाली.यापूर्वी त्यांना डॉ द.भि.खानोलकर बांदा पुरस्कृत जनसेवा निधी पुरस्कार नेमळे शिक्षण संस्थेचा उपक्रमशील शिक्षका पुरस्कार , लोकमान्य मल्टिपर्पज , तरुण भारत आयोजित सेवाभावी शिक्षक पुरस्कार , मान.ना.दिपक केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत शिक्षक सेवक सन्मान पुरस्कार , शिक्षक महर्षी डॅा.रा.का.शिरोडकर स्मृती आदर्श पुरस्कार मिळाले आहेत ''.कुणासाठी कुणीतरी'' व ''दिला शब्द तुला'' ही त्यांची पुस्तके यापूर्वी प्रकाशित झाली आहेत.