स्मित मच्छार यांचा अमिरातीकडून गौरव
धैर्य दाखवून टाळला होता दहशतवादी हल्ला
वृत्तसंस्था/ दुबई
विमान चालवत असताना प्रसंगावधान आणि अतुलनीय धैर्य दाखवून भीषण दहशतवादी हल्ला टाळणारे भारताचे वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांचा संयुक्त अरब अमिरातीकडून गौरव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फ्लायदुबई विमानाच्या कर्मचारीवर्गाचाही सन्मान करण्यात आला आहे. या सर्वांना संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल् नहयान यांच्याकडून ‘फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायेद 2’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला. हा पुरस्कार दुबईचे राजपुत्र शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल् मख्तुम यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आला, अशी माहिती देण्यात आली आहे.
मच्छार हे फ्लायदुबई कंपनीच्या विमानाचे प्रमुख वैमानिक होते. ते दुबईहून आपले विमान घेऊन इस्रायलला चालले असताना आकाशात त्यांच्यावर त्यांचा सहवैमानिक हमाम अल् हमामी याने जीवघेणा हल्ला केला. त्याने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर घाव घातला आणि त्यांना भोसकून विमान आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. विमान ताब्यात घेऊन ते इस्रायलमधील महत्वाच्या आस्थापनावर आदळवून मोठा दहशतवादी हल्ला करण्याची त्याची योजना होती. तथापि, हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतही मच्छार यांनी विमान आपल्याच नियंत्रणात ठेवत, कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यामुळे इतर प्रवाशांना आत काय झालेले आहे याची कल्पना आली. काही प्रवाशांनी त्वरित आत जाऊन हल्लेखोर वैमानिकाला पकडून दाबून धरले. त्यानंतर विमानाच्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने हे विमान सौदी अरेबियात सुखरुप उतरविले. गंभीर जखमी मच्छार यांच्यावर विमानातीलच इस्रायली डॉक्टरने प्रथमोपचार केले. विमान उतरल्यानंतर मच्छार यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात येऊन त्यांच्यावर विशेष उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांचे प्रसंगावधान आणि धैर्य यांच्यामुळे एका भीषण प्रसंगातून जगाची सुटका झाली आहे.
मच्छार यांची जगभरात प्रशंसा
या घटनेनंतर कॅप्टन स्मित मच्छार यांची जगभरातून प्रशंसा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मच्छार यांनी देशाची मान गर्वाने उंचावली आहे, अशा शब्दांमध्ये त्यांचे कौतुक केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांनी मच्छार यांच्या धैर्याची प्रशंसा केली. मे मध्ये इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलनाचा कार्यक्रम इस्रायलमध्ये होणार आहे.
