चोवीस तासात आवळल्या मुसक्या
चेनस्नॅचिंग प्रकरणी सराईत भामट्याला अटक, 74 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त, शहापूर पोलिसांची कामगिरी
प्रतिनिधी/ बेळगाव
बाजार गल्ली, खासबाग येथे चेनस्नॅचिंग करणाऱ्या तरुणाला चोवीस तासात शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. तो एक सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याने एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. केवळ चोवीस तासात आरोपीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस पथकाचे आयुक्तांनी कौतुक केले आहे.
समानअहमद रियाजअहमद नकरची (वय 29) रा. दुसरा क्रॉस, संगमेश्वरनगर असे त्याचे नाव आहे. त्याच्याजवळून 4 लाख 47 हजार रुपये किमतीचे 74 ग्रॅम 930 मिली सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्याने गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी, उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. ए. चौगला, हवालदार एस. एम. गुडदैगोळ, नागराज ओसप्पगोळ, श्रीधर तळवार, जगदीश हादिमनी, शिवराज पच्चन्नवर व सिद्धराम मुगळखोड आदींचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने समानअहमदच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3.50 वाजण्याच्या सुमारास बाजार गल्ली, खासबाग येथील अनुराधा विनायक सुरेपान (वय 43) या महिलेच्या गळ्यातील दागिने भामट्याने पळविले होते. अनुराधा वडगाव येथील आपल्या एका नातेवाईकाच्या घरी श्रावण शुक्रवारनिमित्त लक्ष्मीपूजनाला गेल्या होत्या. पूजन आटोपून दुचाकीवरून घरी पोहोचल्या. त्यावेळी ही घटना घडली होती.
अनुराधा या आपल्या घरासमोर दुचाकी उभी करीत होत्या. त्यावेळी भामट्याने त्यांना पाठीमागून लाथ मारली. अनुराधा खाली पडल्या, त्यावेळी भामट्याने त्यांच्या गळ्यातील दोन मंगळसूत्रे व एक हार असे दागिने पळविले होते. केवळ चोवीस तासात शहापूर पोलिसांनी भामट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जामिनावर सुटताच...
समानअहमदने 13 मार्च 2024 रोजी सदाशिवनगर येथे चेनस्नॅचिंग केले होते. हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. फुटेजवरून केवळ दोन दिवसात एपीएमसी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. कामावर जाणाऱ्या लक्ष्मी कल्लाप्पा केलीकेतर (वय 45) या महिलेच्या गळ्यातील दागिना पळविण्यात आला होता. या प्रकरणातून जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा चेनस्नॅचिंग केले आहे.