तामिळनाडूच्या ५२ मंदिरामध्ये स्मार्टफोनवर बंदी
5 रुपयांमध्ये जमा करावा लागणार फोन : परिसरात सेल्फी अन् रील्सना मनाई : व्हीआयपींवरही लागू होणार नियम
वृत्तसंस्था/चेन्नई
तामिळनाडू सरकारने राज्यातील 52 प्रमुख मंदिरांमध्ये स्मार्टफोन नेण्यावर अन् वापर करण्यावर बंदी घातली आहे. हा नियम लागू झाला असून यानुसार भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी स्मार्टफोन काउंटरवर जमा करावा लागणार आहे. भाविकांना प्रत्येक स्मार्टफोनकरता 5 रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. तर कॅमेराशिवाय असलेले मोबाइल फोन मंदिराच्या आत नेण्याची अनुमती असेल. मंदिर परिसरात छायाचित्रण, रील तयार करणे आणि व्हिडिओ रिकॉर्ड करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
या नियमाच्या अंतर्गत मंदिर परिसरात व्हीआयपी, महनीय व्यक्ती आणि प्रसिद्ध लोकांची छायाचित्रे काढणे किंवा चित्रण करण्याचीही अनुमती नसणार आहे. राज्याचे हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोमेंट्स मंत्री रमेश यांनी ही माहिती दिली आहे. हा निर्णय 2 डिसेंबर 2022 रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाच्या आदेशाच्या आधारावर जारी करण्यात आला आहे. मंदिर परिसरांमध्ये भाविक, खासकरून युवांकडून छायाचित्रण, रील तयार करणे आणि व्हिडिओ रिकॉर्ड करण्यावरून सातत्याने चिंता व्यक्त केल्या जात होत्या.
स्लीप घ्यावी लागणार
ज्या मोबाइल फोनमध्ये कॅमेरा नाही, ते मंदिराच्या आत नेण्याची अनुमती असेल. नव्या नियमाचा उद्देश मंदिराचे पावित्र्य आणि शांततापूर्ण वातावरण कायम राखणे आहे. नव्या व्यवस्थेच्या अंतर्गत स्मार्टफोन बाळगणाऱ्या भाविकांना मंदिराच्या प्रवेशद्वारावर निर्मित खास दालनांवर स्मार्टफोन जमा करावा लागेल. भाविकांना यानंतर एक एक्नॉलेजमेंट स्लिप किंवा प्लास्टिक टोकन देण्यात येईल. स्मार्टफोन परत मिळवेपर्यंत हे टोकन स्वत:कडे बाळगावे लागणार आहे असे मंत्री रमेश यांनी सांगितले.
व्यवस्थेची अंमलबजावणी सुरू
कांचीपुरम येथील प्रसिद्ध देवराजस्वामी-अथि वरदार मंदिरात मंगळवारपासून ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. तेथे मोबाइल फोन जमा करण्यासाठी दोन कॉम्प्युटर ऑपरेटर आणि दोन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दालनावर भाविकाचा फोटो, मोबाइल फोनचे मॉडेल आणि संपर्क क्रमांक नोंदणीकृत केला जातो आणि एक्नॉलेजमेंट स्लिप दाखविणे आणि माहितीची पडताळणी झाल्यावर फोन परत केला जातो.
जनहित याचिकेवर सुनावणी
उच्च न्यायालयाने तिरुचेंदूर येथील अरुलमिगु सुब्रमण्यम स्वादी मंदिरात स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवल सुनावणीनंतर यासंबंधीचा आदेश दिला होता. तर त्यापूर्वी देखील मंदिरांमध्ये मोबाइल फोन नेण्यावर बंदी घालणे आणि मोबाइल सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
भाविकांना माहिती देण्यात येणार
मंदिर प्रशासनाला प्रवेशद्वार आणि मंदिर परिसराच्या बाहेर मोबाइल फोनच्या वापरावरील बंदीची माहिती देणारे फलक लावयण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे भाविकांना या नियमाची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारने मंदिर परिसरात देवी-देवतांच्या मूर्तीची छायाचित्रे काढणे, व्हिडिओ तयार करणे आणि धार्मिक विधींच्या रिकॉर्डिंगवरही बंदी घातली आहे.