पाकिस्तानात अखेर स्मार्ट लॉकडाउन
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची घोषणा
मध्यपूर्वेत जारी तणाव आणि इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांच्या वाहतुकीला रोखण्यात आल्यावर जागतिक इंधन संकट निर्माण झाले असून यामुळे पाकिस्तान मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची टंचाई पाहता पाक सरकारने ऊर्जाबचतीसाठी कठोर पावले उचलत देशभरात ‘स्मार्ट लॉकडाउन’सारखे उपाय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सिंध प्रांत वगळता देशाच्या उर्वरित हिस्स्यांमध्ये बाजार, शॉपिंग मॉल आणि दैनंदिन वापराच्या उत्पादनांची विक्री करणारी दुकाने रात्री 8 वाजेपर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा निर्णय मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष आणि होर्मुझमधील वाहतूक प्रभावित होत उदभवलेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा बचतीसाठी घेण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून जारी वक्तव्यात म्हटले गेले आहे.
-खैबर पख्तूनख्वा, पंजाब, बलुचिस्तान, इस्लामाबाद, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये बाजार आणि शॉपिंग मॉल रात्री 8 वाजेपर्यंत बंद होतील. पंतप्रधान कार्यालयानुसार नवे नियम मंगळवारी रात्री 8 वाजल्यापासून लागू झाले आहेत.
-खैबर पख्तूनख्वाच्या विभागीय मुख्यालयांमध्ये बाजार रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहू शकणार आहेत.
-बेकरी, रेस्टॉरंट, तंदूर आणि खाद्यपदार्थ विकणारी दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत उघडी राहू शकतील.
-विवाहसोहळ्यांसाठी वापरण्यात येणारे हॉल, टेंट आणि अन्य स्थळेही रात्री 10 वाजेपर्यंत बंद होतील. खासगी संपत्ती, घरांमध्ये रात्री 10 वाजल्यावर विवाहसोहळे आयोजित करण्यास बंदी असेल.
-औषध दुकाने, फार्मसींना या कालमर्यादेपासून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
सिंधमध्येही लवकरच लागू होणार
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बैठकीनंतर पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तानच्या मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रीय हिताकरता सर्वसंमतीने निर्णय घेतल्याबद्दल आभार मानले आहेत. सिंध सरकार देखील अन्य प्रांतांप्रमाणे ऊर्जा संरक्षण उपाययोजना लागू करणार असल्याची अपेक्षा शाहबाज यांनी व्यक्त केली. याचबरोबर गिलगिट आणि मुजफ्फराबादमध्ये एक महिन्यापर्यंत आंतरशहरी सार्वजनिक परिवहन मोफत करण्यात आले असून याचा खर्च पाकिस्तान सरकार उचलणार आहे. सरकारच्या डिजिटल वॉलेट अनुदान योजनेच्या अंतर्गत पेट्रोलियम उत्पादनांच्या खरेदीवर 1 लाख रुपयांपर्यंतचा दिलासाही जारी ठेवण्यात आला आहे.
सिंधवरून बैठका जारी
सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी कराची चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोरंगी असोसिएशन ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. पाकिस्तानची सद्यस्थिती पाहता आम्हा सर्वाना स्वत:ची भूमिका पार पाडावी लागेल. बाजारपेठ खुलण्याच्या वेळेचा निर्णय सल्लामसलतीनंतरच घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना दिले आहे. व्यापार संघटनांकडून करण्यात आलेल्या शिफारसींच्या समीक्षेनंतर पंतप्रधान शाहबाज यांना अहवाल सोपविला जाणार आहे. सिंध सरकार गरीबांवरील भार कमी करण्यासोबत ऊर्जा संरक्षणाचे उपाय सुनिश्चित करणार असल्याचा दावा मुराद यांनी केला.