‘स्मार्ट सिटी’ची कामे कंटाळवाणी, दर्जाहीन
महापौर रोहित मोन्सेरात यांची टीका : कामे पूर्ण करण्यासाठी 30 मे पर्यंतची मुदत
पणजी : स्मार्ट सिटीला आता शहराबाहेर घालविले पाहिजे, अशा शब्दात महापौर रोहित मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटीला त्यांची पात्रता दाखवून दिली आहे. मोन्सेरात यांनी मंगळवारी शहरात फेरफटका मारून या कामांची पाहणी केली. त्यात खास करून सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू असलेल्या मार्केट भागात ते पोहोचले असता व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही अनेक समस्या, अडचणी, तक्रारी, गैरसोयी याबद्दल त्यांना माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मोन्सेरात यांनी, गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली सदर कामे अत्यंत नित्कृष्ट आणि दर्जाहीन असल्याचे सांगितले. लोकांच्या असंख्य कैफियती आणि तक्रारी ऐकल्यानंतर आणि त्यानुसार स्वत: पाहणी केल्यानंतर आपण हे वक्तव्य करत असल्याचे ते म्हणाले. या कामांवर देखरेख ठेवण्यात स्मार्ट सिटीचे अधिकारी अपयशी ठरले आहेत. ते खरोखरच देखरेख करतात की काय हेही कळत नाही.
खरे तर ठराविक कालावधीनंतर नियमित या कामांची पाहणी व देखरेख होणे आवश्यक होते. परंतु तसे होताना दिसत नाही. काही ठिकाणी तर काम पूर्ण झाल्याचेसुद्धा जाणवत नाही, एवढी दुरवस्था झाली आहे, असे मोन्सेरात म्हणाले. आतापर्यंत 18 जून मार्गाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. त्यासंबंधी लोकांच्या तक्रारी आहेत. त्यांचा मनपा पाठपुरावा करत आहे. सध्या चाललेली कामे, त्यांची गती आणि दर्जा पाहून नागरिक तर कंटाळलेले आहेतच, त्याही पेक्षा जास्त आम्ही कंटाळलेलो आहोत. तरीही आम्हाला कामे पूर्ण झालेली हवी आहेत, हेही तेवढेच खरे असले तरी स्मार्ट सिटीकडून एवढ्या दर्जाहीन कामांची अपेक्षा नव्हती. अशी कामे करणाऱ्या स्मार्ट सिटीला आता शहराबाहेर घालविले पाहिजे, त्यामुळे आम्ही त्यांना 30 मे पर्यंतची मुदत दिली असून केलेल्या चुका सुधारण्यासह सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यास सांगितले आहे, असे मोन्सेरात यांनी सांगितले.