स्मार्ट सिटीचे कार्यालय धूळखात पडून
एखादे मनपा कार्यालय सुरू करण्याची मागणी
बेळगाव : मोठा गाजावाजा करत शहरात स्मार्ट सिटी कार्यालय उभारण्यात आले. परंतु, सद्यस्थितीत टिळकवाडी येथील स्मार्टसिटी कार्यालय धूळखात पडले आहे. या कार्यालयाचा कोणताच वापर होत नसल्याने किमान मनपाचे एखादे कार्यालय या ठिकाणी सुरू झाल्यास त्याचा फायदा नागरिकांना होईल. टिळकवाडी येथील स्मार्ट सिटी कार्यालय सध्या बंद आहे. या जागेचा इतर कार्यालयासाठी तरी वापर होणे गरजेचे आहे. कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स येथे दक्षिण विभागातील अनेक वॉर्डची कार्यालये आहेत. जागा अपुरी असल्याने या ठिकाणी दाटीवाटीने कर्मचारी तसेच अधिकारी कामकाज करीत असतात. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कार्यालयाची जागा मनपाच्या एखाद्या विभागाला देण्याची मागणी केली जात आहे. मंगळवारी झालेल्या अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत या कार्यालयाबाबत चर्चा झाली. स्मार्ट सिटी कार्यालय धूळखात पडले असल्याने त्याचा वापर केल्यास टिळकवाडी, अनगोळ परिसरातील नागरिकांना फायदा होईल, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यामुळे धूळखात पडलेल्या या कार्यालयाचा आता कोणता वापर होतो, हे पहावे लागणार आहे.