For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्मार्ट’ बस थांबे हा मोठा घोटाळा!

12:54 PM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘स्मार्ट’ बस थांबे हा मोठा घोटाळा
Advertisement

मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडून पर्दाफाश : मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दाखविला भ्रष्टाचार,चौकशीसाठी विशेष बैठक घेण्याची मागणी

Advertisement

पणजी : स्मार्ट सिटी विकासकामांच्या नावाखाली चाललेल्या बजबजपुरीची जबाबदारी घेण्यास नकार देऊन यापूर्वी सरकारला घरचा अहेर दिलेले पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली आहे. यावेळी त्यांनी शहरात उभारण्यात आलेल्या ‘स्मार्ट’ बस शेडवरून मुख्यमंत्र्यांना लेखी कळवले असून हा एक मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. राजधानीत उभारण्यात आलेल्या ‘स्मार्ट बसस्थानकांची’ रचना अत्यंत खराब असून हे बसस्थानक म्हणजे जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याचा डाव आहे, असा घणाघाती आरोप मोन्सेरात यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रात मोन्सेरात यांनी, बस निवारा शेडच्या सुमार डिझाइनमधील घोटाळा, जाहिरात अधिकार कराराचा अनधिकृत वापर, तसेच इमेजिन पणजी स्मार्ट सिटीद्वारे सुरू असलेली कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत यासह या एकंदरीत घोटाळ्यावर चर्चा आणि चौकशी करण्यासाठी तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे.

हा तर दर्जाहीन डिझाईन

Advertisement

या बसस्थानकाचा निकृष्ट आणि दर्जाहीन डिझाईन पाहता कोणत्याही परिस्थितीत त्यांना स्मार्ट म्हणता येणार नाही. त्यापेक्षा त्याला जनतेच्या पैशांची लूट करणारा घोटाळा म्हणावे लागेल. या प्रकारामुळे कदंब महामंडळ आणि प्राईमस्लॉट्स इव्हेंट्स प्रा. लि. यांच्यात झालेल्या जाहिरात अधिकारांच्या कराराशी असहकार ठरेल व त्यातून पणजी मनपाचे प्रचंड महसूली नुकसान होऊ शकते, असा दावा मोन्सेरात यांनी केला आहे.

प्रवाशांची सुरक्षा येऊ शकते धोक्यात

एवढेच नव्हे तर या बसशेडची रचनाच अशी अवघड आहे की त्यामुळे बसचालक आणि प्रवासी यांना एकमेकांना पाहणे अवघड बनवते, त्यातून प्रत्येकाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राजधानीत सात मार्गांवर एकुण 48 बसेसद्वारे प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार असून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या भागात मिळून 36 बस थांबे बांधण्यात येत आहेत.

बस थांबा ज्येष्ठांना, दिव्यांगा सुखमय नाही

खरे तर या शेड सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच ज्येष्ठ, दिव्यांग यांच्यासाठीही वापरण्यास व प्रवेश करण्यास सोपे, सुखकर आणि आरामदायक असणे आवश्यक होते. परंतु येथे चित्र उलट आहे. कला अकादमीसमोर स्थापन करण्यात आलेला थांबा तर रॅम्पच्या अतिउच्च उतारामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी पूर्णत: असुरक्षित ठरला आहे. त्यामुळे यापुढे सुयोग्य बसस्थांबे बनविण्यासाठी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी पात्र आणि सक्षम एजन्सीसोबत सहकार्य करणार आहे, असे मोन्सेरात म्हणाले.

बसस्थानक प्रवाशांना उपयुक्त नाही

या बसस्थानकांचा आकारही एकदमच लहान आहे. त्यामुळे तेथे किती लोक निवारा घेऊ शकतील हा गहन प्रश्न आहे. त्याशिवाय बसण्याची व्यवस्था तर अगदीच अयोग्य आहे. त्याही पलिकडे जाताना त्याचे छत सावली देण्यासाठी किंवा ऊन पावसापासून प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी अपुरे आहे. त्याशिवाय हे स्थानक शहराच्या हवामानासाठीही अयोग्य आहेत, असा दावा मोन्सेरात यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.