अल्पबचत, सुकन्या व्याजदर ‘जैसे थे’
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अल्पबचत योजना, सुकन्या योजना आणि पीपीएफ यांच्यावरील व्याजदरात कोणतेही परिवर्तन न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे या सर्व योजनांमध्ये ठेवलेल्या ठेवींवर गेल्या वेळेइतकेच व्याज मिळणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने ही घोषणा सोमवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे.
या योजनांमधील गुंतवणुकीवरील व्याजदरांचा आढावा, दर तीन महिन्यांनी घेतला जातो. 30 जूनला झालेल्या वित्त विभागाच्या बैठकीत व्याजदर आहे त्याच पातळीवर ठेवण्याचा निर्णय झाला. सध्याच्या परिस्थितीत हा निर्णय झाला असून आणखी तीन महिन्यांनी व्याजदरात वाढ करण्याचा किंवा ते कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती समतोल असल्याने व्याजदरात कोणतेही परिवर्तन न करण्याचा निर्णय घेतला गेला आहे, असे स्पष्ट केले गेले.
कोणत्या योजनेवर किती व्याजदर
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (पीपीएफ) 7.1 टक्के व्याजदर आहे तोच राखण्यात आला आहे. सुकन्या योजनेवरील व्याजदर 8.2 टक्के आहे. ही योजना बालिकांसाठी असून या योजनेत गुंतविलेले पैसे पुढे त्यांच्या विवाहासाठी उपयोगात आणले जातात. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदरही 8.2 टक्के या पातळीवर राखण्यात आला आहे, अशी घोषणा करण्यात आली आहे.