For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर घुमल्या ‘संयुक्त महाराष्ट्रा’च्या घोषणा

07:05 AM Jun 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर घुमल्या  ‘संयुक्त महाराष्ट्रा’च्या घोषणा
Advertisement

म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना सभेवेळी मज्जाव :  कोल्हापूर पोलिसांकडून दिवसभर स्थानबद्ध

Advertisement

 त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी कोल्हापूर येथे आले होते. त्यांच्या भेटीसाठी म. ए. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार होते. परंतु त्यापूर्वीच काही कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. तरीदेखील काही कार्यकर्त्यांनी पोलिसांची नजर चुकवत कोल्हापूर गाठून अमित शहा यांच्या सभेच्या ठिकाणी पोहोचले. गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. यामुळे काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.

Advertisement

अमित शहा यांच्या सभेसाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी होऊ शकते म्हणून त्यांना रोखण्यात आले. तरीदेखील काही कार्यकर्त्यांनी सभेच्या मंडपात प्रवेश मिळविला. गृहमंत्री अमित शहा भाषणाला उभे राहताच बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यामुळे गृहमंत्र्यांनाही दखल घ्यावी लागली. पोलिसांनी तात्काळ त्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

दिवसभर केले स्थानबद्ध

कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करताच त्यांना जवळच्या एका खोलीमध्ये दिवसभर स्थानबद्ध करण्यात आले. दुपारपासून रात्री 8 वाजेपर्यंत पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. घोषणा दिल्याप्रकरणी सचिन केळवेकर, नारायण सावगावकर, अनिल पाटील, सूरज चव्हाण, साईराज जाधव, शांताराम होसूरकर, श्रीपाद काकतीकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सभास्थळी जाण्यास मज्जाव

सभेच्यास्थळी जाणाऱ्या म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केला. यामुळे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. तरीदेखील काही कार्यकर्ते सभेच्यास्थळी पोहोचले. याप्रकरणी मालोजी अष्टेकर, आर. एम. चौगुले, मदन बामणे, शिवराज पाटील, गणेश द•ाrकर, उमेश पाटील, सुहास हुद्दार, श्रीकांत कदम, सूरज कुडूचकर, पियुष हवळ, सागर सावगावकर, रणजीत हावळाण्णाचे, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, आकाश भेकणे, निखील देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अन् टोलनाक्यावर शोधशोध

कर्नाटक पोलिसांकडून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. परंतु मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी पोलिसांना चकवा देत दुसऱ्या वाहनाने कोल्हापूर गाठले. बेळगावच्या पोलिसांकडून मालोजी अष्टेकर यांची शोधशोध टोलनाक्यावर सुरू झाली. परंतु ते कोल्हापूरला पोहोचल्याचे समजताच पोलिसांचा संताप झाला. पोलिसांची नजर चुकवून थेट तेथे जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सीमाप्रश्नाची रोखठोक भूमिका मांडली.

Advertisement
Tags :

.