Lanja News : बंधाऱ्यावरून चालताना पाय घसरून नदीत पडल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
काजळी नदीतून पलिकडे जाताना 'ती'चा नदीतील बंधाऱ्यावरून पाय घसरला
लांजा : नदीतील बंधाऱ्यावरून पलिकडे असलेल्या दत्त मंदिरात जाणाऱ्या अनुष्का अनिल चव्हाण (19, मूळ कोंडगे, सध्या रा. मुंबई-बोरिवली) हिचा पाय घसरून नदीत पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मठ येथील काजळी नदीत शनिवारी सकाळी 11.45 च्या वाजण्याच्या सुमारास घडली.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का चव्हाण ही लांजा तालुक्यातील पुनसकोंड येथील आपल्या मामाच्या गावी सुट्टीसाठी आली होती. ती नातेवाईकांसोबत शनिवारी सकाळी 11.15 वाजता दत्त मंदिरात जाण्यासाठी घरातून निघाली. ते सगळे पुनसकोंड येथून काजळी नदीतून पलिकडे जात असताना अनुष्काचा नदीतील बंधाऱ्यावरून पाय घसरला आणि पाण्यात पडून ती वाहत गेली.
पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्याने मंदिरापासून 300 ते 350 मीटरवर पाण्यात ती बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाली येथे दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेने पुनसकोंड तसेच कोंडगे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबत लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नासिर नावळेकर करत आहेत.