For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसाममधील पूरस्थितीत किंचित सुधारणा

06:01 AM Jun 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
आसाममधील पूरस्थितीत किंचित सुधारणा
Advertisement

 ब्रह्मपुत्रासह प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत घट : पूरग्रस्तांच्या मदतकार्यात एनडीआरएफ जवान व्यग्र

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाममधील पूरपरिस्थितीत किंचित सुधारणा झाली आहे. ब्रह्मपुत्रेसह प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होत असली तरी राज्यातील 18 जिह्यांमध्ये अजूनही चार लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. बहुतेक जिह्यांमध्ये पाऊस कमी झाला असला तरी काही ठिकाणी तुरळक पाऊस सुरूच आहे. पाऊस ओसरत असल्यामुळे प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. धुब्रीमधील ब्रह्मपुत्रा, धर्मतुलमधील कोपिली, हैलाकांडीच्या कटखलमधील बराक नदी आणि श्रीभूमीमधील कुशियारा नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे.

Advertisement

शनिवारी पूरसंबंधित घटनांमध्ये कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, कामरूप जिह्यात एक व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळी गुवाहाटीतील रुपनगर भागात भूस्खलन झाल्याने एक व्यक्ती गाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे झालेले भूस्खलन आणि पुराच्या घटनांमध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

काही भागात परिस्थिती बिकट

18 जिह्यांमधील 54 महसूल मंडळांअंतर्गत 1,296 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. याशिवाय, 16,558.59 हेक्टर शेती जमीन अजूनही पाण्याखाली आहे. तसेच 2,96,765 जनावरे बाधित झाली आहेत. पुरामुळे विस्थापित झालेल्या 40,313 हून अधिक लोकांनी 328 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे, तर 1,19,001 लोकांना बाधित जिह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या केंद्रांवर मदत पुरवण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी शुक्रवारी आठवड्यात दुसऱ्यांदा बराक खोऱ्याला भेट देत लोकांना वेळेवर पुनर्वसन अनुदान देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी दुर्गा पूजा उत्सवापूर्वी रस्त्यांसारख्या खराब झालेल्या पायाभूत सुविधांची दुरुस्ती केली जाईल, असेही स्पष्ट केले.

4 लाख लोक मदत छावण्यांमध्ये

आसाममधील पूर परिस्थिती इतकी धोकादायक आहे की केवळ गावांमध्येच नाही तर शहरांमध्येही लोक आपले घर सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. पूरग्रस्त भागात एकूण 328 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत ज्यात 4 लाखांहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. या छावण्यांमध्ये पूरग्रस्तांना अन्न आणि इतर सुविधा पुरवल्या जात आहेत.

वन्यजीवही पुराच्या विळख्यात

ब्रह्मपुत्रा नदीतील पुरामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. तर पोबिटोरा वन्यजीव अभयारण्याचा 70 टक्के भाग ब्रह्मपुत्रा आणि कोपिली नद्यांमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गंभीरपणे प्रभावित झाला आहे. पुरामुळे एकशिंगी गेंडा आणि इतर वन्यजीवांसह प्राण्यांना आश्रयासाठी उंच ठिकाणी जावे लागले आहे. वन कर्मचारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वन्यजीवांवर पुराचा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सिक्कीममध्ये भूस्खलनानंतर 44 पर्यटकांना वाचवण्यात यश

ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आसामसह सिक्कीम, मणिपूरमध्ये पुरामुळे अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत. शहरांमध्येही रस्त्यांवर बोटी फिरताना दिसत आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एसडीआरएफ आणि लष्कराची मदत घेतली जात आहे. उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर राज्यातील 15 जिह्यांमधील 4 लाखांहून अधिक लोक निसर्गाच्या प्रकोपामुळे बाधित आहेत. उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे चाटेन परिसरात अडकलेल्या 44 पर्यटकांना लष्कर आणि एनडीआरएफने वाचवले आहे. यापैकी चार पर्यटक अजूनही बेपत्ता आहेत.

Advertisement

.