For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेवटच्या दिवशी शेअर बाजारात अल्पशी घसरण

06:45 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेवटच्या दिवशी शेअर बाजारात अल्पशी घसरण
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली वाढ त्याचप्रमाणे जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार शुक्रवारी देखील घसरणीत बंद झाला. सेन्सेक्स 331 आणि निफ्टी 102 अंकांनी घसरत बंद झाला. सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारामध्ये घसरण मोठ्या प्रमाणात होती. सरतेशेवटी शेअरबाजार बऱ्यापैकी सावरण्यामध्ये यशस्वी झाला.

शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 331 अंकांनी कोसळत 76059 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 102 अंकांनी कमकुवत होत 23767 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक मात्र तेजीमध्ये राहिला होता. हा निर्देशांक 102 अंकांनी वधारत 56693च्या स्तरावर बंद झाला. विविध क्षेत्राच्या निर्देशांकांमध्ये आयटी व पीएसयू बँक निर्देशांक तेजीत होते. ऑटो, मेटल व रियल्टी यांचे समभाग मात्र दबावासोबत कार्यरत होते. सेन्सेक्समध्ये 30 पैकी 20 समभाग घसरणीत होते. तर निफ्टीतील 50 पैकी 33 समभागांमध्ये दबाव होता. बँक निफ्टी निर्देशांकात 14 पैकी 11 बँकांची कामगिरी सकारात्मक पहायला मिळाली. रुपया 1 पैसा मजबूत होत 96.56 वर बंद झाला. सकाळच्या सत्रामध्ये 100 डॉलर प्रति बॅरल असणारा ब्रेंटक्रूडचा दर सरतेशेवटी 96 पर्यंत खाली आला होता.

Advertisement

समभागांच्या कामगिरीबाबत पाहता भारती एअरटेल, एशियन पेंट, इन्फोसिस हे समभाग घसरणीत होते. तर एचसीएल टेक, आयटीसी, अॅक्सिस बँकचे समभाग मात्र तेजीसोबत बंद झाले. यांना ट्रेंट, टीसीएस आणि मारुती सुझुकी यांनीसुद्धा मजबुतीसोबत सहारा दिला. सकाळच्या सत्रामध्ये सेन्सेक्स जवळपास 800 अंकांनी खाली आला होता. इंट्रा डे दरम्यान सेन्सेक्स 75535 च्या स्तरावर खाली आला होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकदेखील 250 अंकांनी घसरत 23619 च्या स्तरावर उच्चांकी पातळीवर घसरला होता. मिडकॅप-100 आणि स्मॉलकॅप-100 निर्देशांक जवळपास 1 टक्का कमकुवत होत बंद झाले. या विक्रीच्या बाजारामध्ये काही मिनिटांतच गुंतवणुकदारांचे 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. एकूण सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य मागच्या सत्रातील 477 लाख कोटीच्या तुलनेमध्ये घसरत 473 लाख कोटी रुपयांवर आले होते.

Advertisement
Tags :

.