दोन मिनिटात झोपा
रात्री लवकर झोप न लागणे ही अनेकांची समस्या आहे. सध्याच्या काळात तर ‘नाईट लाईफ’चे प्रमाण अधिक झाल्याने ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आयुरारोग्य भेटे’ ही म्हण जवळपास इतिहासजमा झाल्याचे दिसून येते. याशिवाय कामाचा ताण, खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणे, चमचमीत खाण्यामुळे होणारा आम्लपित्ताचा विकार इत्यादी अनेक कारणांमुळे असंख्यांना लवकर झोप येत नाही.
अशा निद्राविकाराने प्रभावित असलेल्या लोकांसाठी एमिली नामक एका महिलेने एक रामबाण उपाय सुचविला आहे. निदान तसे या महिलेचे म्हणणे आहे. तिने टिकटॉकवर यासंबंधीचा एक व्हिडीओ पोस्ट केला असून तो 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. काही निद्राशास्त्र तज्ञांनीही या महिलेचे तंत्र प्रभावी असल्याचे प्रशंसा पत्र दिले आहे. या महिलेच्या तंत्रानुसार झोपण्यासाठी आपण पलंगावर पडल्यानंतर, प्रथम दीर्घ श्वास घ्यावा. नंतर आपल्या मनात असे एक घर आणावे की जे आपल्या घरासारखे आहे, पण आपण रहात असलेले नाही. असे घर मनात आणल्यानंतर या घरातील एका छोट्या वस्तूसंबंधी विचार करावा. या घराचा दरवाजा, घरातील छोट्या वस्तू, फर्निचर, टेबलावर ठेवलेले सामान इत्यादी वस्तू मनात आणाव्यात. असे करत करत या घरातील सर्व वस्तू आपल्या मनात येण्यापूर्वीच आपल्याला गाढ झोप लागेल. या महिलेने हा प्रयोग यशस्वीरित्या केल्याचे प्रतिपादन केले आहे. मात्र, एकाच कोणतीतरी वस्तू आपल्या मनात ठाण मांडून बसली तर लवकर झोप येणार नाही. मन सतत एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे असे फिरत राहिले पाहिजे, असे या महिलेचे म्हणणे आहे.