For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतराळ मोहीमेत ‘स्कायरुट’ने नवीन युगाचा ‘प्रारंभ’ केला !

06:14 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंतराळ मोहीमेत ‘स्कायरुट’ने नवीन युगाचा ‘प्रारंभ’ केला
Advertisement

भारताचं पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट ‘स्कायरूट विक्रम’चं प्रक्षेपण यशस्वी झालं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून स्कायरूट एरोस्पेसच्या ‘विक्रम 1’ चं ऐतिहासिक प्रक्षेपण करण्यात आलं आहे. हैदराबादस्थित या अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप कंपनीनं आपल्या पहिल्या ऑर्बिटल रॉकेटच्या प्रक्षेपणाद्वारे इतिहास घडवला आहे. हे प्रक्षेपण भारताच्या वेगानं विस्तारणाऱ्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

Advertisement

अंतराळ क्षेत्रात भारताची एक खासगी कंपनी ‘स्कायरूट एरोस्पेस’ ने भारताच्या खासगी पद्धतीने विकसित केलेल्या पहिल्या रॉकेट विक्रम-1 ला यशस्वीरित्या लाँच करून नवीन इतिहास रचला आहे. हा असा एक क्षण आहे ज्याची भारताच्या प्रायव्हेट सेक्टरने खूप काळापासून वाट पाहिली होती. आता आशा आहे की स्कायरूटच्या यशामुळे इतरांसाठीही अंतराळाचे दरवाजे उघडतील. अंतराळ समुदायातील अनेक लोक असे मानतात की ही मोहीम, भारताच्या अधिकृत अंतराळ संस्था, इस्रो आणि खासगी क्षेत्र यांच्यातील सहकार्यासाठी नवीन सुरुवात आहे. स्कायरूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक, पवन कुमार चंदना यांनी ट्वीट केले की, ‘हा क्षण भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून नोंदवला जाईल.’

2018 मध्ये स्थापन झालेल्या ‘स्कायरूट एअरोस्पेस’ने आजवर सुमारे 95.5 दशलक्ष डॉलर (रु.850 कोटी) निधी उभारला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये या कंपनीने ‘विक्रम-एस’ या उपकक्षीय वाहनाचं यशस्वी प्रक्षेपण करून पहिली खासगी भारतीय रॉकेट लाँच करणारी कंपनी म्हणून इतिहास रचला होता. ‘स्कायरूट एअरोस्पेस’ला टेमासेक आणि जीआयसी सारख्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे. कंपनी 2026 पासून दर तीन महिन्यांनी एक रॉकेट लाँच करण्याचं उद्दिष्ट ठेवत असून, 2027 पासून दर महिन्याला एक रॉकेट लाँच करण्याचा त्यांचा मानस आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन चंदना यांनी सांगितलं की, “एक रॉकेट तयार करायला सुमारे आठ ते नऊ महिने लागतात आणि त्यासाठी 2 ते 3 दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे रु.16 ते 25 कोटी) खर्च येतो. मात्र, प्रत्येक लाँचमधून सुमारे 5 दशलक्ष डॉलर (रु. 42 कोटी) इतकं उत्पन्न अपेक्षित आहे.” हे उत्पन्न भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून मिळणाऱ्या पेलोड्समुळे असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. लहान उपग्रहांच्या वाढत्या जागतिक मागणीमुळे कंपनीला प्रचंड संधी मिळेल, असा विश्वास कंपनीला वाटतो.

Advertisement

स्कायरूट ही एक नवीन कंपनी आहे, ज्याची स्थापना 2018 मध्ये झाली होती. 2020 मध्ये जेव्हा भारत सरकारने अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी उघडल्याची घोषणा केली, तेव्हा स्कायरूट ही इस्रोसोबत रॉकेट लॉन्च करण्यासाठी सहमती पत्र (एमओयू) वर सही करणारी पहिली खासगी कंपनी बनली होती. या कंपनीने देशाचा पहिले खासगी पद्धतीने विकसित क्रायोजेनिक हायपरगोलिक-लिक्विड आणि सॉलिड इंधनावर चालणारे इंजिन आधारित रॉकेट बनवून त्याचे यशस्वी परीक्षण केले आहे. स्कायरूटने हे

रॉकेट तयार करण्यासाठी अॅडव्हान्स्ड कंपोझिट आणि थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कोणत्याही स्टार्टअप कंपनीसाठी ही काही छोटी उपलब्धी नाही. स्कायरूट, विक्रमच्या नावाने अनेक उपग्रह तयार करत आहे, ज्याचे नाव भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावर ठेवले गेले आहे. स्कायरूट हे रॉकेट लहान लहान सॅटेलाइट लाँच करण्याच्या हेतूसाठी तयार करत आहे. अलीकडच्या वर्षांत अशा सॅटेलाइट्सचे महत्त्व खूप वाढले आहे. आगामी दशकात वीस हजाराहून अधिक लहान उपग्रह लाँच होण्याचा अंदाज आहे आणि विक्रम मालिकेच्या रॉकेट्सना असे डिझाइन केले गेले आहे की ती अभूतपूर्व कमी किमतीवर तयार करून, खूप कमी किंमतीत

सॅटेलाइट लाँच करू शकतील. विक्रम-वन

रॉकेटला 480 किलो वजन लो इन्क्लिनेशन

ऑर्बिटपर्यंत नेण्यासाठी विकसित केले जात आहे. त्याचबरोबर विक्रम-टू रॉकेट 595 किलो वजन आणि विक्रम-थ्री रॉकेट 815 किलो पेलोडलो इन्क्लिनेशन ऑर्बिटपर्यंत नेण्यास सक्षम असेल. विक्रम सिरीजच्या रॉकेटच्या माध्यमातून ग्राहकांना गरजेनुसार छोटे सॅटेलाईट लॉन्च करण्याची सोय असेल. स्कायरूटच्या मते, त्यांच्या रॉकेटला कुठल्याही लॉन्च साइटवर 24 तासांच्या तयारीत लॉन्च करता येईल. या गोष्टीवरून हे स्पष्ट होते की कंपनी मागणीनुसार सॅटेलाईट लॉन्च करण्याची सोय देण्याच्या तयारीत आहे.

प्रा. डॉ. गिरीश नाईक

Advertisement
Tags :

.