स्कायरूट एरोस्पेस बनली युनिकॉर्न कंपनी
त. भा. वृत्तसंस्था
दिल्ली: भारतातील खासगी क्षेत्रातील अंतराळ क्षेत्राशी संबंधीत स्कायरूट एरोस्पेस यांनी गुरुवारी 60 दशलक्ष डॉलरचा निधी उभारल्याची घोषणा केली आहे. या निधी उभारण्याच्या घोषणेनंतर कंपनीचे मूल्य 1.1 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. या योगे सदरची कंपनी युनिकॉर्न गटामध्ये सामील झाली आहे.
कोणी केली गुंतवणूक
शेरपालो व्हेंचर्स आणि जागतिक संस्थात्मक गुंतवणूक यांच्या संयुक्त विद्यमाने वरील निधी गुंतवण्यात आला आहे. या निधी उभारणीमध्ये सध्याचे गुंतवणूकदार ग्रीन को समुहाचे संस्थापक व अरकम व्हेंचर्स यांचाही सहभाग होता. कंपनीच्या गुंतवणुकदारांमध्ये जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ब्लॅकरॉकचा समावेश आहे.
संचालक मंडळात राम श्रीराम यांचा समावेश
शेरपालोचे संस्थापक, प्रसिद्ध टेक गुंतवणुकदार आणि अल्फाबेट इंकचे संचालक मंडळाचे सदस्य राम श्रीराम हे स्कायरुटच्या संचालक मंडळामध्ये समाविष्ट होणार आहेत.