गगनविहारी
शांत निर्भय मच्चित्त ब्रम्हचर्य-व्रती स्थिर । मन रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण।। 14 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. विवरणात माउली म्हणतात, आसनसिद्धी झाल्यावर वज्रासनाच्या उष्णतेने कुंडलिनी जागृत होते. तिच्या धाकाने प्राण आणि अपान रोखले जातात. त्यामुळे शरीरशुद्धी होते. शरीरात आत व बाहेर थंडावा निर्माण होतो, सर्व शरीरात नवचैतन्याचा उदय होतो. योग्याचे शरीर तेजस्वी दिसू लागते. त्याच्यात अलौकिक शक्ती आलेल्या असतात.
अनेक प्रकारच्या सिद्धी त्यास प्रसंगानुरूप प्राप्त होतात. ही कुंडलिनीशक्ती हृदयात म्हणजे अनाहत चक्रात येते आपल्या तेजाची शिदोरी चैतन्याला अर्पण करते. मग तो चैतन्याचा झरा हृदयाच्या पोकळ भूमीत जिरून, शक्तीचे रूप शक्तीमधेच मावळते. शक्ती म्हंटले असले तरी वास्तविक तो प्राणवायूच असतो. त्यास नाद, बिंदु, कला, ज्योती हे चारही धर्म नसतात. मनाचा निग्रह करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकार तेथे रहात नाहीत.
ही स्थिती पंचमहाभूतांची पक्की आटणी असल्याने ही कल्पना घे, ती कल्पना टाक, असे वाटत नाही. पिंडाने पिंडाचा ग्रास करणे म्हणजे पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करणे होय. हे आदिनाथ शंकर यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे परंतु हे मर्म श्रीविष्णुने दाखवून दिले. कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते, तेव्हा देहाचा आकार नाहीसा होऊन देह वायुरूप होतो. देह सूक्ष्म झाल्यामुळे योग्याला जगाच्या लोकांच्या डोळ्यातच लपता येते. वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो, परंतु आता तो देह जसा वायूचाच बनवलेला असावा असा हलका होतो. अथवा केळीतील सोपटे काढून टाकून ती जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत असा तो देह दिसतो तेव्हा त्यास खेचर म्हणजे गगनविहारी असे म्हणतात. देहधारी लोकात असे रूप होणे म्हणजे मोठा चमत्कार आहे.
पंचमहाभूतांची पक्की आटणी झाल्यावरच ही स्थिती येते. योग्याचा देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो, परंतु आता तो देह इतका हलका होतो की, त्यात फक्त हवाच असावी असे वाटते. देहात असलेल्याचे असे रूप होणे हा मोठा चमत्कार आहे. योगी जात असताना पावलापावलावर आणिमादिक सिद्धी उत्पन्न होतात. गीतेत भगवंतांनी सिद्धींना महत्त्व दिलेले नाही हे लक्षात घेऊन माऊली पुढे म्हणतात, आपल्याला त्या सिद्धींशी काय काम आहे? योग्याच्या देहातच तीनही भूतांचा लोप पुढीलप्रमाणे होतो. पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते व तेजाला वायु हृदयामध्ये नाहीसा करतो.
प्राणवायु एकटा उरतो पण तो शरीराच्या आकाराएवढाच असतो. मग तोही काही वेळाने निघून आकाशातील वायूत मिसळून जातो. त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते व तिला ‘मरुत्’ असे नाव मिळते. पण जोपर्यंत ती शिवाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत तिची शक्ति कार्यरत असते. त्यामुळे मग ती जालंदर बंधाचे उल्लंघन करून टाळ्यावरती नऊ इंद्रियांचे ऐक्य होण्याचे जे काकीमुख म्हणून स्थान आहे, त्याचा भेद करून मग र्मूध्न्याकाशरूपी पर्वतावर जाऊन राहते. ती ओंकाराचे पाठीवर पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते. पुढे समुद्रात कशा नद्या मिळालेल्या दिसतात, त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मूळ ओंकारात मिसळून जातात. येथे योग्याचा योगाभ्यास पूर्ण होतो.
क्रमश: