मजबूत अर्थव्यवस्थेत कुशल कामगारांचा मोठा हातभार!
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे उद्गार : प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
मडगाव : मजबूत अर्थव्यवस्थेकडे देशाची वाटचाल सुरू आहे. यात कुशल कामगारांचे मोठे योगदान असल्याचे उद्गार केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काढले. मडगाव रवींद्र भवनात प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील 3 विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र व बॅचेसचा शुभारंभ आभासी पद्धतीने केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, अनिवासी भारतीय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था वाढत असतानाच अनेक संधी उपलब्ध होत आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी युवावर्गाने कौशल्य प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. त्यांनी भविष्याचा विचार कऊन विकसित भारत मिशनमध्ये सहभागी व्हावे आणि कौशल्य प्राप्त करावे, असे केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव चंद्रशेखर पुढे बोलताना म्हणाले. राजीव चंद्रशेखर पुढे म्हणाले की, 10 वर्षांपूर्वी 42 कोटीमधील तब्बल 31 कोटी जणांकडे शिक्षण व कौशल्य नव्हते. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून प्रत्येकाला कौशल्य विकासाची संधी देण्यात येत आहे. काम करणाऱ्या प्रत्येकाला कौशल्य शिक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
गोव्यातील 25 हजार युवकांना फ्युचर रेडी-इंडस्ट्री रेडी प्रशिक्षण
सध्या देश जागतिक पाचव्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. यात कौशल्यप्राप्त केलेल्या युवकांचा मोठा हातभार असेल. यातून रोजगाराची निर्मिती होईल. गोव्यातील 25 हजार युवकांना फ्युचर रेडी व उद्योग सज्ज कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान व इतर क्षेत्रात संधी मिळणार आहे. प्रत्येक घरात कौशल्य असलेल्या व्यक्ती असाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक युवकाकडे कौशल्य असणे आवश्यक आहे. जागतिकस्तरावरील कौशल्य युवकांनी मिळवावे, असे आवाहन राजीव चंद्रशेखर यांनी केले.
प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात गोवा प्रथम
पीएम विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राची सुऊवात देशात प्रथम गोव्याने केलेली आहे. नोंदणीत देशात आपण दुसऱ्या क्रमांकावर असलो तरी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात गोवा प्रथम आहे. कौशल्य विकासात 18 शाखांतून प्रशिक्षण दिले जाईल. काहीजणांना केवळ 18 जाती दिसून येतात. राज्य सरकारने 32 इंडस्ट्रिजसोबत करार केला आहे. यापुढे पदवी घेतली म्हणजे नोकरी मिळणार नाही. किमान एका वर्षाचा कामाचा अनुभव किंवा अप्रेंटिशीप असणे आवश्यक असेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपल्या भाषणात म्हणाले.
या पूर्वी देशातील कोणत्याही सरकारने काम करणाऱ्या हातांचा सन्मान केला नाही. हा सन्मान आता डबल इंजिन भाजप सरकारकडून होत आहे. दहा हजार युवकांना रोजगार देण्याचा संकल्प करत सुमारे 9 हजार युवकांना नोकऱ्या प्रदान केल्या. इतरही लवकरच दिले जातील. सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे बोलताना म्हणाले. काम करणाऱ्यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. त्यानंतर कारागिरांना कर्जाची सोय केली. कर्ज घेताना सख्खा भाऊ जामीन म्हणून सही करत नाही, अशावेळी केवळ ‘मोदी की गॅरंटी’ चालत आहे व विनातारण कर्ज उपलब्ध केले जात आहे. नारीशक्ती, युवाशक्ती, किसानशक्ती व गरीब कल्याण या चार तत्त्वांवर सरकारचे काम सुरू आहे.
गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे. जिथे हर घर जल, प्रत्येक घरी शौचालय दिले आहे. आता लवकरच ‘हर घर फायबर’सह हरघर कौशल्य देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हर घर फायबर देण्याचा उपक्रम सुरू झालेला आहे. मात्र, केंद्राकडून आणखी मदत मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कार्यक्रमावेळी गुऊ सन्मान अंतर्गत विविध क्षेत्रातील कारागिरांचा सत्कार करण्यात आला.