For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेपत्ता वृद्धाचा शेतात सांगाडा आढळल्याने परिसरात खळबळ

09:59 PM May 16, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
बेपत्ता वृद्धाचा शेतात सांगाडा आढळल्याने परिसरात खळबळ
representatinal image
Advertisement

प्रतिनिधी | चंदगड
चंदगड तालुक्यातील उमगाव पेकी माळीवाडी येथे पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका वृद्धाचा सांगाडा शेतात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेंडा टेक परिसरातील शेतामध्ये हा मानवी सांगाडा आढळून आला असून, तो बेपत्ता झालेल्या धोंडीबा विठोबा सावंत (वय ७९, रा. उमगाव पेकी माळीवाडी, ता. चंदगड) यांचा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

Advertisement

या घटनेमुळे माळीवाडीसह संपूर्ण उमगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीबा सावंत हे गेल्या १५ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास “शेताकडे जाऊन येतो” असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. दिवसभर वाट पाहूनही ते न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील शेतवाड्यांमध्ये त्यांचा शोध घेतला. मात्र अनेक दिवस शोधमोहीम राबवूनही त्यांचा काहीच मागमूस लागला नव्हता.

कुटुंबियांची तक्रार

Advertisement

अखेर कुटुंबीयांनी चंदगड पोलिस ठाण्यात धोंडीबा सावंत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडूनही शोध सुरू होता. मात्र तब्बल पाच महिन्यांनंतर गुरुवारी शेंडा टेक परिसरातील एका शेतात काही नागरिकांना मानवी सांगाडा दिसून आला. सांगाडा दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तात्काळ याची माहिती चंदगड पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

सांगाड्यावरुन पटली ओळख

घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांवरून व कुटुंबीयांच्या ओळखीवरून हा सांगाडा धोंडीबा सावंत यांचाच असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सांगाड्याजवळ आढळलेल्या काही वस्तूंवरूनही ओळख पटविण्यात मदत झाल्याचे समजते. बेपत्ता झालेल्या वृद्धाचा अखेर सांगाडा सापडल्याने सावंत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गावावर शोककळा

गावातही शोककळा पसरली असून, अनेकांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, वृद्धाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल ए. बी. नाईक करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण समजून घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून, आवश्यक त्या वैद्यकीय व तांत्रिक तपासण्या करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Advertisement
Tags :

.