एसकेई सोसायटी, बेळगाव स्पोर्ट्स क्लब विजयी
एटू चषक 11 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स आयोजित एटू चषक 11 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत एसकेई संघाने हिरण्यकेशी फाऊंडेशन गडहिंग्लजचा 2 धावांनी पराभव केला तर बेळगाव स्पोर्ट्स क्लबने हिरण्यकेशी फाऊंडेशनचा 19 धावांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. सुफियान, सक्षम चव्हाण यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. फिनिक्स मैदानावरती पहिल्या सामन्यात एसकेई संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्वगडी बाद 136 धावा केल्या. सक्षम चव्हाणने 7 चौकारांसह 36, अश्वथ कुलकर्णी व अनय जाधव यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. हिरण्यकेशी गडहिंग्लजतर्फे रणवीर मोरेने 18 धावात 3, कुणाल कांबळेने 4 धावात 2, रिदांत तालेकरने 13 धावात 2 तर आयुष व रणवीर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हिरण्यकेशी फाऊंडेशन संघाने 20 षटकात 9 गडी बाद 134 धावा केल्या.
शौर्य अनलेने 9 चौकारांसह नाबाद 68, रणवीर करंडेने 12 तर रिदांत तालेकरने 10 धावा केल्या. एसकेईतर्फे विहान एस. ने 27 धावात 2 तर श्रेयस व विहान श्रृंगेरी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्वगडी बाद 133 धावा केल्या. तेजस गवसने 1 षटकार 5 चौकारांसह 33, अक्षित जायण्णाचेने 4 चौकारांसह 26, प्रथम आलबेलने 11 तर विहान पाऊसकरने 2 चौकारांसह 10 धावा केल्या. हिरण्यकेशी गडहिंग्लजतर्फे तेजस गावितने 6 धावात 3, रणवीर मोरेने 18 धावात 2 तर आर्यन नवलगीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हिरण्यकेशी गडहिंग्लजने 20 षटकात 8 गडी बाद 114 धावा केल्या. आर्यन नवलगीने 6 चौकारांसह 37, कुणाल कांबळेने 4 चौकारांसह 27, वरद पठाण व आयुष यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. बीएसईतर्फे सुफियानने 15 धावात 2 तर यशवंत, श्लोक, आदित्य उपाध्ये यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.