For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिया गोयल : लग्न संस्थेसमोर आव्हान!

06:55 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिया गोयल   लग्न संस्थेसमोर आव्हान
Advertisement

लोहगड पुणे येथे केतन अग्रवाल यांच्या खुनामुळे केवळ पुणे शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच देशही हादरुन गेला. आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर ढोंगी पद्धतीने प्रेमाचे नाटक करायचे आणि आतून कारस्थान करायचे हे एखाद्या तरण्याबांड सुशिक्षित, चांगल्या घराण्यातील मुलीला शोभून दिसत नाहीच. भारतीय संस्कृती आणि परंपरेला काळीमा फासणारी अशीच ही घटना आहे. केतन अग्रवाल हा अग्रवाल बिल्डर्स उद्योगपतीचा सुशिक्षित मुलगा वय 24 वर्षे, आणि तो विदेशात शिकून भारतात आलेला. सिया गोयल ही तरुणी देखील बड्या व्यापाऱ्याची मुलगी. तिचे चेतन चौधरी नावाच्या तरुणावर प्रेम जडले. घरच्या मंडळींना ते पसंत नव्हते, त्यामुळे त्यांनी प्रस्ताव आल्यानंतर लागलीच केतन अग्रवाल या सुशिक्षित उद्योगपती युवकाबरोबर तिचे लग्न ठरविले. येत्या नोव्हेंबरमध्ये हा शाही विवाह सोहळा जयपूर येथील पॅलेसवर होणार होता. त्यासाठी केतन अग्रवालच्या वडिलांनी महनीय व्यक्तींसाठी दोन विमानांचे बुकिंग केलेले होते. शिवाय त्या पॅलेसवर सर्व व्यवस्थेसाठी 70 कोटी रुपयांची तरतूद केली होती. दोन्ही घराण्यांना जोडणारा हा दुवा होता. सर्वकाही सुरळीत चालले असताना सियाच्या मनामध्ये मात्र काही वेगळेच चालले होते. चेतन चौधरीला तिला सोडण्याची इच्छा नव्हती. अलीकडे विवाहपूर्वी प्री-वेडिंग शूटिंग केले जाते. त्यासाठी केतन व सियाने मालदीवला जायचे ठरविले आणि त्यासाठी तिकिटे देखील काढली. विमानतळावर जायच्यावेळी केतनचा पासपोर्ट हरवला. प्रत्यक्षात तो सियाजवळ होता आणि तिने तो फाडून टाकला होता. शेवटी दौरा रद्द करून विमानतळावरून थेट घरी यावे लागले. हे सर्वकाही नियोजनबद्ध कटकारस्थान होते. त्यानंतर तिला लोहगडला जायची इच्छा झाली. तिने केतनला फार आग्रह केला. तिच्या आग्रहास्तव केतन लोहगड किल्ल्यावर गेला. किल्ला बघत असताना अचानकपणे सियाने त्याला ढकलले, जेणेकरून तो 400 फूट खाली दरीमध्ये पडून मरण पावला असता. परंतु झाडाझुडपामध्ये तो अडकला आणि वाचला. तेवढ्यात तिने “साप साप” असे ओरडून भीती निर्माण केली आणि आपण तुला कसे वाचवले, हे सांगत तिने आपले प्रेम त्याच्याबद्दल व्यक्त केले. ते घरी आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा 18 जून रोजी ते पुन्हा त्याच ठिकाणी गेले. यावेळी सियाचा प्रियकर चेतन चौधरी वेगळे कपडे घालून त्या परिसरात होता. पुन्हा एकदा किल्ल्याच्या तटबंदीवर आल्यानंतर चेतनच्या मदतीने केतनला किल्ल्याच्या तटबंदीच्या कपारीतून ढकलून दिले आणि तिथेच तो मरण पावला. ही दर्दभरी कहानी ऐकल्यानंतर साहजिकच तळपायाची आग मस्तकाला भिडणार. पुढील आठवड्यात वटसावित्री पौर्णिमा आहे. आपल्या देशातील तमाम महिलावर्ग आपल्या पतीबद्दल फार आदर बाळगून, जन्मोजन्मी हाच पती मिळू दे असे देवाकडे साकडे घालतात. आपल्या पतीला देवास्वरूप मानतात. ही आपली संस्कृती, ही आपली परंपरा. या संस्कृतीत वाढलेला हा देश आणि येथील परंपरा पाहता सियासारख्या नवतरुणीने हे असे दुष्कृत्य करावे? घरातील मुलाचे किंवा मुलीचे लग्न जेव्हा ठरते, तेव्हा ज्यांच्या घरात मुलगी देणार त्यांच्याशी एक नवे नाते जोडण्याचे मोठे कार्य होते आणि आपल्या नातेवाईकांच्या संख्येत वाढ होते. एकमेकांबद्दलचा आदर, प्रेमभावना निर्माण होत असते. मुलीला लक्ष्मीसमान दर्जा दिला जातो आणि घरात येणाऱ्या जावयाला नारायणस्वरुप मानले जाते. म्हणूनच त्यांना लक्ष्मीनारायणचा जोडा असेही म्हटले जाते. अशा या परंपरेमध्ये सियासारखी तरुणी आपल्या होणाऱ्या पतीचा काटा काढते ही अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक गोष्ट आहे. केतनने असा कोणता अपराध केला होता की त्यामुळे त्याचा खून व्हावा! उलटपक्षी त्याने तिच्यावर निर्व्याज प्रेम केले होते. आपल्या हृदयात तिला स्थान दिले, असे असताना ती मात्र कपटी, कारस्थानी निघाली. खरे तर तिला चेटकिणच समजावे. लग्न संस्थेमध्ये दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचे आणि संसाराची ही दोन महत्त्वाची चाके आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्या मुलीने आपल्याला हे स्थळ पसंत नव्हते तर त्याचवेळी सांगून आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली असती तरीही फार मोठे काही घडले नसते. दुसऱ्याच्या जीवावर उठण्याचा जो प्रकार तिने केला तो अत्यंत हीन, धक्कादायक, भारतीय स्त्राr परंपरेला काळीमा फासणारा. आज तिने स्वत:चा संसार उद्ध्वस्त केलाच, त्याहीपेक्षा तिने आपल्या घराण्याची बदनामी केली. एवढेच नव्हे तर भारतीय लग्न परंपरेसमोर आव्हान निर्माण केले. असे प्रकार घडू नयेत यासाठी लग्न संस्थांनी नवतरुण आणि नवतरुणी यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.