बेळगाव-बेंगळूर सुपरफास्ट एक्स्प्रेसची सहा वर्षांची अविरत सेवा
बेळगाव : बेळगावच्या लोकांची बेंगळूरला जाण्यासाठीची हक्काची एक्स्प्रेस असलेल्या बेळगाव-बेंगळूर सुपरफास्ट एक्स्प्रेसची सहा वर्षे अविरत सेवा सुरू आहे. या एक्स्प्रेसने शनिवार दि. 1 रोजी सातव्या वर्षात प्रवेश केला आहे. ‘अंगडी एक्स्प्रेस’ नावाने परिचित असलेल्या या एक्स्प्रेसमुळे बेळगावकरांचा बेंगळूरपर्यंतचा प्रवास सुखकर झाला आहे.बेळगावचे माजी खासदार व केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात बेळगावच्या लोकांना या एक्स्प्रेसची भेट दिली. 1 नोव्हेंबर 2019 ला ही एक्स्प्रेस पहिल्यांदा धावली. त्यापूर्वी बेंगळूरला जाण्यासाठी मिरज-बेंगळूर मार्गावर धावणारी राणी चन्नम्मा एक्स्प्रेस ही एकमेव रेल्वे उपलब्ध होती.
जिल्ह्यातील सर्व प्रवासी एकाच एक्स्प्रेसवर अवलंबून असल्याने रेल्वेचे तिकीट मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. याचा विचार करून सुरेश अंगडी यांनी बेंगळूरसाठी स्पेशल रेल्वे सुरू केली. रात्री 9 वाजता बेळगावमधून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता बेंगळूरला पोहोचते. त्यामुळे नागरिकांना रात्रीचे जेवण करून सकाळच्या नाश्त्यासाठी बेंगळूरला जाणे सहजशक्य झाले. स्वच्छ व नीटनेटकी रेल्वे असल्यामुळे अल्पावधीतच एक्स्प्रेसला मोठा प्रतिसाद मिळाला. या एक्स्प्रेसला कायम बुकिंग फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. सहा वर्षे अविरत सेवा दिल्यानंतर आता ही एक्स्प्रेस सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे. काही रेल्वे प्रवाशांनी या रेल्वेचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.