प्रथमच सहा महिलांची अवकाशवारी
‘ब्लू ओरिजिन’च्या यानातून अकरा मिनिटांमध्ये 200 किलोमीटरचा प्रवास
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
इतिहासात प्रथमच एकाचवेळी सहा महिलांनी अवकाशवारी केली आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध उद्योगपती जेफ बेझोस यांची वाग्दत्त वधू लॉरेन, सुप्रसिद्ध हॉलिवूड गायिका केटी पेरी आदी विख्यात महिलांचा या अवकाशवारीत समावेश होता. जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या यानातून त्यांनी हा प्रवास केला. त्यांनी 11 मिनिटे अंतराळात वास्तव्य करताना 200 किलोमीटरचा प्रवास केला. अशाप्रकारे 1963 नंतर प्रथमच केवळ महिलांचा समावेश असलेल्या एका संघाने अंतराळ प्रवास केला आहे.
अंतरिक्षातून भूमीवर आल्यानंतर या महिलांनी त्यांचे अनुभव कथन केले. केटी पेरी यांनी भूमीचे चुंबन घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. तर जेफ बेझोस यांनी आपली वाग्दत्त वधू लॉरेन सांचेझ हिची गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला. या प्रवासासाठी या महिलांना प्रत्येकी 1.15 कोटी रुपये इतका खर्च आला. हा अंतराळ प्रवास हा बेझोस यांच्या न्यू शेफर्ड कार्यक्रमाचा एक भाग आहे. या अभियानाला एनएस-31 असे नाव देण्यात आले होते. टीव्ही सादरकर्ती गेल किंग, मानवाधिकार कार्यकर्ती अमांडा गुयेन, चित्रपट निर्माती केरियन फ्लिन आणि नासाच्या माजी अग्नीबाण संशोधक आईशा बोवे आदी या कार्यक्रमाच्या अंतर्गत अंतराळ प्रवास करणाऱ्या अन्य चार महिला होत्या, अशी माहिती देण्यात आली.
कंपनीसंबंधी अल्प माहिती...
ब्लू ओरिजिन ही एक खासगी अंतराळ प्रवास कंपनी आहे. तिची स्थापना 2000 मध्ये जेफ बेझोस यांनी केली आहे. या कंपनीचे यान न्यू शेफर्ड या नावाने ओळखले जाते. ते पुनउ&पयोगी आहे. ते व्यवस्थित पृथ्वीवर उतरावे, यासाठी या यानात विशेष तंत्रवैज्ञानिक व्यवस्था करण्यात आली आहे. या यानातून प्रवास करण्यासाठी अंतराळयात्रीला दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.