For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अधिवेशन बंदोबस्तासाठी सहा हजार पोलिसांचे बळ

12:46 PM Nov 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
अधिवेशन बंदोबस्तासाठी सहा हजार पोलिसांचे बळ
Advertisement

गृहमंत्र्यांची माहिती : 15 हजार पोलीस भरती करणार

Advertisement

बेळगाव : बेळगावच्या सुवर्णविधानसौधमध्ये 8 ते 19 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी 6 हजारहून अधिक अधिकारी व पोलीस जुंपण्यात येणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. याबरोबरच मटका व जुगार थोपविण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस मुख्यालयात बुधवारी आढावा बैठक झाली. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक हितेंद्र आर., बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड,पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्यासह हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त व उत्तर विभागातील सर्व पोलीसप्रमुख उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. जी. परमेश्वर पुढे म्हणाले, अधिवेशनाच्या काळात चोख बंदोबस्त असणार आहे. कोणत्याही समस्या येऊ शकतात. शेतकरी संघटना, विद्यार्थी यांच्यासह विविध संघटनांची आंदोलने होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर कोणती खबरदारी घ्यावी, अधिवेशनाच्या काळात वाहतूक व्यवस्थेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयी चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक जाहीरनाम्यात अडीच लाख रिक्त जागा भरण्याचे आश्वासन दिले होते. या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.  545 पोलीस उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आणखी 402 पोलीस उपनिरीक्षकांची भरती झाली आहे.

Advertisement

600 पोलीस उपनिरीक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. लवकरच 3 हजार 600 हून अधिक पोलीस भरती केली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनानंतर या प्रक्रियेला चालना मिळेल. पोलीस दलात पंधरा हजार रिक्त पदे असल्याचेही त्यांनी सांगितले. मटका, जुगारासंबंधी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हे गैरधंदे थोपविण्याची सूचना आपण राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. याकामी अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. याबरोबरच गुन्हेगारी प्रकरणात अडकणाऱ्या अधिकारी व पोलिसांची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात येईल, असा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला.

Advertisement
Tags :

.