Shirala Crime | चोरट्यांचा अजब कारनामा! दुकाने फोडून पळाले, पण 'चायनीज'वर ताव मारायला विसरले नाहीत; काय घडलं?
कापरी नाक्यावर चोरट्यांचा धुमाकूळ
शिराळा - शिराळा शहरातीलबायपास रोडवरील कापरी नाका येथे चोरट्यांनी रात्रीत सहा दुकाने फोडली असून एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर सदर चोरट्यांनी विविध दुकानातून जवळपास एक लाख रुपयांची रोकड चोरी करून पोबारा केला.
सदर चोरट्यांनी येथील एका चायनीज दुकानात काही नसापडल्याने फ्रिज मधील चायनीजवर ताव मारल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. सोमवार पहाटे ही घटना घडली. शिराळा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
शिराळा येथील बायपास रोड कापरी नाका येथे अनेक प्रकारचे व्यवसाय असल्याने सदरचा चौक गजबजलेला असतो. याच चौकातील हॉटेल शिवनंदन, एस. के. पान शॉप,मामा चायनीज, तुळशी मिसळ, सर्व्हिसिंग सेंटर या दुकानांच्या पत्र्यांचे रक्कू काढून चोरी केली आहे.
यामधील एक चोरटा दुकानांच्या पत्र्यांचे स्कू काढून आत प्रवेश करून पाहणी करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. संशयित चोरट्याने अंगात डोक्यापासून पायापर्यंत पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करून तोंड बांधले आहे. हाताचे ठसे येऊ नयेत म्हणून हातात हँडग्लोज व पायात बूट घातल्याचे दिसत आहे.