For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरमल येथे सहा रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी

06:44 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
हरमल येथे सहा रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी
Advertisement

खांबावरील विजेच्या ठिणगीमुळे लागली आग : लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

Advertisement

हरमल / वार्ताहर

हरमल-खालचावाडा बीचवरील एका रेस्टॉरंट जवळील वीज खांबावर उडालेल्या  ठिणगीमुळे रेस्टॉरंटला आग लागली. वाऱ्याच्या झोतामुळे बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केल्याने बाजूच्या बंद रेस्टॉरंटपर्यंत आग पोहोचली. या आगीत एकूण सहा रेस्टॉरंट जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाचे वाहन रेतीत ऊतल्याने आग विझविण्यासाठी जवानांसह स्थानिकांना अथक प्रयत्न करावे लागले.

Advertisement

काल शनिवारी पहाटे 3 वा. च्या सुमारास वीज खांबावर आगीच्या ठिणग्या दृष्टीस पडल्याने नागरिकांनी लागलीच रेस्टॉरंट मालकास घटनेची कल्पना दिली व किंमती सामान बाहेर काढण्यास मदत केली. मात्र वाऱ्याच्या झोताने आगीने प्रखर रुप धारण केले व नजीकच्या सहा रेस्टॉरंट मालकाना फटका बसला, असे नागरिक हरेश मयेकर यांनी सांगितले. सगळे रेस्टॉरंट बंद होते, शिवाय गॅस सिलिंडर नसल्याने नुकसानीचा आकडा वाढला नाही.

अग्निशामक दलाचा बंब किनाऱ्यावर रुतला

आगीची माहिती पेडणे आग्निशामक दलाला मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली मात्र रेस्टॉरंटपर्यंत पोहोचण्याआधीच दलाची गाडी किनाऱ्यावर ऊतली. गाडी पुढे जात नसल्याने जवानांनी पोलिस व नागरिकांच्या मदतीने पाणी मारुन आग आटोक्यात आणल्याची माहिती मयेकर यांनी दिली.

वीस मीटर उंच माड जळाले

या आगीत अंदाजे वीस मीटर उंचीचे माड पूर्णत: जाळून खाक झाले शिवाय अन्य चार माड व झाडे करपून गेली. यावरुन आगीच्या ज्वाला किती उंच गेल्या होत्या, याचा अंदाज येतो. या आगीमुळे काही पक्क्या जुन्या बांधकामांची दारे, खिडक्या व तावदाने निकामी झाली, त्यामुळे जबर नुकसानी झाली.

आमदार जीत आरोलकर यांची मदतीसाठी धाव

या घटनेची माहिती समाजकार्यकर्ते जॉकी रॉड्रिग्ज यांनी आमदार जीत आरोलकर यांना देताच पहाटे 3.30 वा. जीत आरोलकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशामक दलाच्या जवानांना आदेश दिले, त्याचबरोबर स्वत:ही बादलीने पाणी घेऊन आग विझवण्यात योगदान दिले. मदतीसाठी धाऊन आलेल्या आमदार जीत आरोलकर यांचे नागरिकांनी कौतुक केले.

स्थानिकांनी एकजुटीने आग विझवण्याचे काम केले. पेडणे अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव परवार व अन्य जवानांनी तसेच मांद्रे पोलिसांनी आग विझविण्यात मोलाची भूमिका बजावली. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.

Advertisement
Tags :

.