For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हाथरस प्रकरणी सहा जणांना अटक

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
हाथरस प्रकरणी सहा जणांना अटक
Advertisement

मुख्य आयोजकावर 1 लाखाचे इनाम : साकार बाबांचीही चौकशी केली जाणार

Advertisement

वृत्तसंस्था /हाथरस

हाथरस येथील सत्संग कार्यक्रमात झालेल्या भीषण दुर्घटनेसंबंधात उत्तर प्रदेश सरकारने मोठी कारवाई केली आहे. सत्संग कार्यक्रमाचे प्रमुख साकार बाबा तथा भोले बाबा यांच्या सहा सेवादारांना अटक करण्यात आली आहे. त्यांनीच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, असा पोलिसांचा आरोप आहे. या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल. त्यानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर पडेल असे प्रतिपादन अधिकाऱ्यांनी केले. या प्रकरणी सादर करण्यात आलेल्या तक्रारीत अद्याप सत्संगप्रमुख साकार हरि बाबा याचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, त्यांचीही चौकशी केली जाईल. तसेच त्यांनाही अटक होऊ शकते. मुख्य आयोजक मधुकर याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलेले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी संभाव्य स्थानी पोलीस पथके पाठविण्यात येत आहेत, अशीही माहिती देण्यात आली.

Advertisement

जबाबदारी कोणाची

साकार हरी किंवा भोलेबाबा हे सत्संगचे प्रमुख असले तरी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांचे उत्तरदायित्व प्रमुख असते. त्यामुळे आयोजकांची चौकशी आधी करण्यात येईल. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे भोलेबाबा यांची चौकशी करायची का नाही, याचा निर्णय घेण्यात येईल. पोलीस या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करत असून कोणतीही शक्यता नाकारण्यात आलेली नाही. चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

मृतदेह उचलू दिले नाहीत

कार्यक्रमाच्या स्थानी अनेक मृतदेह पडलेले होते. तथापि, बाबांच्या सेवादारांनी पोलीस आणि साहाय्यता कर्मचाऱ्यांना ते मृतदेह उचलू दिले नाहीत. बाबांच्या कृपेने हे भाविक पुन्हा जिवंत होतील, असे त्यांचे म्हणणे होते. यामुळे साहाय्यता कार्यात अडथळे निर्माण झाले, असा आरोप पोलिसांनी केला. कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारे बहुतेक सर्व सेवादार चेंगराचेंगरी होत असल्याचे पाहून तेथून पळून गेले. त्यांच्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली असून उरलेल्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहितीही पोलिसांनी पत्रकारांना दिली.

न्यायिक आयोगाची स्थापना

या भीषण दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग स्थापन करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश ब्रजेश कुमार हे या आयोगाचे अध्यक्ष असतील. निवृत्त सनदी अधिकारी हेमंत राव आणि निवृत्त आयपीएस अधिकारी भावेश कुमार यांची नियुक्ती आयोगाचे सदस्य म्हणून करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण करण्यासाठी आयोगाला 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आयोगाचे मुख्य कार्यालय लखनौ येथे असेल. आयोगाचे सदस्य प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करतील. चौकशीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मल्लिकार्जुन खर्गे यांची मागणी

अशा दुर्घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर अंधश्रद्धा  निर्मूलन कायदा करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. केंद्र सरकारने लोकांचे प्रबोधन करावे. तसेच सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी, अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत. या दुर्घटनेला प्रशासनाचे दुर्लक्ष जबाबदार आहे, असा आरोप विरोधकांनी यापूर्वी केला होता.

समाजविरोधी शक्तींमुळे दुर्घटना

सत्संग कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेत समाजविरोधी शक्तीचा हात आहे. त्यांनी समाजात भीती निर्माण करण्यासाठी आणि दहशत पसरविण्यासाठी हे कृष्णकृत्य केले. सरकारने त्यांना पकडावे, अशी मागणी साकार हरी बाबा यांनी केली. गेल्या मंगळवारी झालेल्या या चेंगराचेंगरीच्या घटनेत 123 भाविकांचा बळी गेला आहे. बळीमध्ये 112 महिला भाविक आणि 7 बालकांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.