For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चित्रदुर्गजवळ भीषण अपघातात 6 जण ठार

06:38 AM Dec 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
चित्रदुर्गजवळ भीषण अपघातात 6 जण ठार
Advertisement

अपघातानंतर बस-ट्रकला भीषण आग : तिघेजण अद्याप बेपत्ता : पूर्व विभागाचे आयजीपी रविकांतेगौडा यांची माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

भरधाव ट्रकची खासगी बसला धडक बसल्यानंतर लागलेल्या भीषण आगीत  सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. चित्रदुर्ग जिल्ह्याच्या हिरियुर तालुक्यातील जवगोंडनहळ्ळी येथे बुधवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर हा अपघात घडला. बस आणि ट्रकमधील सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप तिघेजण बेपत्ता आहेत, अशी माहिती पूर्व विभागाचे आयजीपी रविकांतेगौडा यांनी दिली आहे.

Advertisement

चित्रदुर्गच्या हिरियुर तालुक्यातील जवगोंडनहळ्ळीजवळ भरधाव ट्रकची दुभाजकाला धडक बसून पलीकडून येणाऱ्या खासगी बसला धडकली. सदर बस  बेंगळूरहून गोकर्णला जात होती. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. बसमधील पाच तर ट्रकमधील चालकाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सुरुवातीला बसच्या डिझेल टाकीला हानी पोहोचल्याने बसला आग लागली. सुदैवाने बसमधील 25 प्रवासी बचावले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. आणखी तिघेजण बेपत्ता आहेत. बसला आग लागल्यानंतर ते खाली उतरले असावेत, असा अंदाज आहे. अधिक चौकशीनंतर याविषयी स्पष्ट होईल, असे आयजीपी रविकांतेगौडा यांनी सांगितले.

25 प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर चित्रदुर्ग, हिरियुर, शिरा येथील शासकीय रुग्णालये व बेंगळूरमधील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. डीएनए चाचणी झाल्यानंतर मृतदेहांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. फॉरेन्सिक टीमने देखील अपघात झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

मृतांपैकी एका महिलेची ओळख पटली आहे. मंड्या जिल्ह्यातील अंकनहळ्ळी येथील नव्या हिचा मृतांमध्ये समावेश आहे. बेंगळूरमध्ये एम. टेक शिक्षण पूर्ण करून सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ती काम करत होती.

मृतांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून 2 लाख तर राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत

चित्रदुर्ग जिल्ह्याच्या हिरीयुरजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री मदतनिधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या कार्यालयाच्या सोशल मीडिया ‘एक्स’ अकौंटवर याबाबतचा संदेश पोस्ट केला आहे. तसेच मृतांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या.

चित्रदुर्गजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. अपघाताविषयी तपास करण्यात येईल.  दुर्घटनेचे वृत्त समजल्यानंतर दु:ख झाले. ख्रिसमसच्या सुटीनिमित्त गावी जाणाऱ्यांचा प्रवास अशा रितीने संपुष्टात येणे हे धक्कादायक आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

‘एक्झिट डोअर’ नसल्यास एफसी नाही : रामलिंगारे•ाr

सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना आपत्कालीन दरवाजे ‘एक्झिट डोअर’ नसल्यास भौतिक कार्यक्षमता प्रमाणपत्र (एफसी) देऊ नये असे कडक आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री रामलिंगारे•ाr यांनी दिली.

आंध्रप्रदेशातील बस अपघातानंतर, आम्ही वाहतूक बसमध्ये कोणत्याही प्रकारचे स्फोटक पदार्थ बाळगू नयेत, असा नियम सक्तीचा केला आहे. प्रवाशांशिवाय अनावश्यक सामान वाहून नेऊ नये यासाठी आम्ही कडक उपाययोजना करत आहोत. लक्झरी बसेस 8 ते 10 फूट उंच असतात. मुले, वृद्ध आणि महिला इतक्या उंचीवरून उडी मारू शकत नाहीत. त्यामुळे परिवहन खात्याच्या सर्व 25,000 बसेस, सर्व खासगी वाहने आणि शालेय वाहनांसाठी आपत्कालीन बाहेर पडण्याचे दरवाजे अनिवार्य करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. कोणतीही नवीन वाहने खरेदी केली गेली तर त्यांना आपत्कालीन दरवाजे नसल्यास एफसी देऊ नये अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.