For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परिवहनच्या ताफ्यात नवीन सहा बसेस

10:17 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
परिवहनच्या ताफ्यात नवीन सहा बसेस
Advertisement

विविध मार्गावर सुसाट, काहीअंशी ताण होणार कमी

Advertisement

बेळगाव : परिवहनच्या ताफ्यात नवीन सहा बसेस दाखल झाल्या आहेत. या नवीन सहा बसचे उद्घाटन गदग आगारामध्ये झाले आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसात या बसेस बेळगावात धावणार आहेत. त्यामुळे बेळगाव परिवहनच्या ताफ्यातील बसेसची कमतरता काहीशी कमी होणार आहे. बेळगाव आगारामध्ये बसेसची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. दरम्यान, नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. याची दखल घेत बेळगाव आगाराला सहा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

बेळगाव जिल्ह्याला महाराष्ट्र आणि गोवा राज्याची हद्द लागून असल्याने आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बसेस देखील अधिक लागतात. मात्र, कोरोना काळात परिवहन मंडळाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे तिजोरीवर भार वाढला होता. दरम्यान, नवीन बसेस खरेदी करणे अशक्य बनले होते. यावेळी परिवहनने बीएमटीसीकडून जुन्या बसेस खरेदी केल्या होत्या. बेळगाव आगारात बीएमटीसीच्या 50 बसेस धावू लागल्या आहेत. मात्र, त्यांचे आयुर्मान संपल्याने रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. सार्वजनिक बससेवेवर परिणाम होऊ लागला आहे. शक्ती योजना सुरू झाल्यापासून महिला प्रवाशांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बसवर अतिरिक्त ताण वाढला आहे. विद्यार्थ्यांना बस मिळणे अशक्य होऊ लागले आहे. बसमध्ये महिला प्रवाशांची संख्याच अधिक दिसत आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना प्रवास त्रासदायक ठरू लागला आहे. बेळगाव आगारात बसचालक, वाहक आणि बसेसची कमतरता देखील असल्याने बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत नवीन सहा बस दाखल होणार असल्याने काहीअंशी ताण कमी होणार आहे. दाखल होणाऱ्या बसेस लांब पल्ल्यासाठी आणि शहरांतर्गत प्रवासासाठी सोडल्या जाणार आहेत.

Advertisement

अद्यापही बसेसची गरज

बेळगाव आगारात नवीन सहा बसेस दाखल होणार आहेत. या बसेस गदग आगारामध्ये उद्घाटन करून बेळगावात येणार आहेत. ज्या ठिकाणी बसेसची कमतरता आहे, त्या ठिकाणी या नवीन बस सोडल्या जाणार आहेत. मात्र, अद्यापही बेळगाव आगाराला बसेसची गरज आहे.

ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)

Advertisement
Tags :

.