तुर्कमान गेट प्रकरणी आणखी 6 अटकेत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीतील तुर्कमान गेट हिंसाचार प्रकरणी आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली महानगरपालिकेने या भागातील अतिक्रमणे हटविण्यासाठी हाती घेतलेल्या अभियानाच्या प्रसंगी हा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात दिल्लीचे 5 पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी जखमी झाले होते. हिंसाचार करणाऱ्या आणखी 25 जणांची ओळख पटविण्यात आली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार या हिंसाचारात साधारणत: 35 जणांचा सहभाग आहे. त्यांच्यापैकी 25 जणांची ओळख व्हिडीओग्राफीवरुन पटविण्यात आली आहे. अन्य 10 जणांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे. हा हिंसाचार बुधवारी झाला होता. अतिक्रमणे हटविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न तेथे जमलेल्या दीडशे जणांच्या जमावाने केला होता.
प्रकरण काय आहे...
दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात असलेल्या मशिदीच्या अवती-भोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. सरकारी जागा बळकाविण्यात आली आहे, असा महापालिकेचा आरोप आहे. हे अतिक्रमणे हटविण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेने अभियान हाती घेतले आहे. त्या अंतर्गत अतिक्रमणे करणाऱ्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. तथापि, त्यांनी ती न हटविल्याने दिल्ली महानगर पालिका कर्मचाऱ्यांनी पोलीस संरक्षणात अतिक्रमणे हटविण्याच्या कामाला बुधवारी प्रारंभ केला होता. तथापि, काही वेळातच तेथे मोठ्या संख्येने तेथे लोक जमले, आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना विरोध केला, यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली, तसेच 25 जणांच्या जमावाने कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली होती. आता येथील परिस्थिती मोठ्या प्रमाणात आटोक्यात आहे.