सहा महिन्यांनंतर चोरीला गेलेले दागिने कुटुंबाबाकडे सुपूर्त
हुपरी प्रतिनिधी
सहा महिन्यापूर्वी पट्टणकडोली इंगळी रस्त्यावर असलेल्या बंद बंगल्याचे कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करून लंपास केलेले पावणे पाच लाख रुपयांचे सोन्यात दागिने हुपरी पोलिसांनी तपास करून ऐन दिवाळीच्या मोक्यावर भाऊबीजेच्या आदल्या दिवशी परत करून दीपावली पाडवा गोड केला याबद्दल जाधव दांपत्याच्या डोळ्यातील आनंदाश्रू सर्व काही सांगून जात असताना दिसत होते. फिर्यादी शुंभागी चंद्रकांत जाधव यांचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक गणेश खराडे त्यांचे सहकारी यांनी भाऊबीजेच्या आदल्या दिवशी आयुष्यात न विसरता येणारी भेट दिल्याच्या भावना व्यक्त करत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आभार मानले.
पट्टणकोडोली इंगळी रस्त्याच्या कडेला चंद्रकांत जाधव यांचा बंगला आहे.जून २०२३ मध्ये घरात कोणी नसलेल्या वेळेत त्यांच्या बंगल्याचे कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करून तिजोरीचे कुलूप तोडून त्यातील ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, २० ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीचा हार,साडेबारा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस , साडेबारा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरट्यांनी चोरून नेले होते या संदर्भात शुंभागी जाधव यांनी फिर्याद दिली होती. तसेच सहा किलो पाचशेसाठ ग्रॅम वजनाचे चांदीचे घुंगरू निरंजन राजेंद्र शेटे यांच्या कंपनीतुन चोरीस गेले होते. याचा हुपरी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश खराडे यांच्यासह पोलिसांचे पथक तयार करून जोरदारपणे शोध मोहीम सुरू करून चोरांना मोठया शिताफीने मुद्देमालासह पकडले. त्यांचेकडून चोरीस गेलेला सोन्या, चांदीचा माल हस्तगत केला.
४ लाख ६२ हजार ५०० रुपये किंमतीचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने शुंभागी चंद्रकांत जाधव यांना दिवाळी सणात भाऊबिजेच्या आदल्या दिवशी दिले व निरंजन राजेंद्र शेटे तर्फे शिवशांत बाळासो माळी यांना २ लाख ६८ हजार ५००रुपये किंमतीचे चांदीचे दागिने दिले. एकूण ७ लाख ३४ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने ऐन दिवाळीत भाऊ बिजेच्या आदल्या दिवशी पाडव्याला दिल्यामुळे त्यांना आनंद झाला होता. त्या महिलेच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू पोलिसांना बरेच काही सांगत होते. शेवटी पोलिसांचे आभार मानून दागिने परत नेले.