गव्याच्या सहा तासांच्या थराराने गावात दहशत, फटाक्यांच्या आवाजाने बाहेर काढण्याचा प्रयत्न अपयशी; शेवटी दमल्यानंतर जंगलाच्या दिशेने ठोकली धूम
आंबा: केर्लेपैकी नेर्लेकरवाडी (ता. शाहूवाडी) येथे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कळपातून भरकटलेला गवा मानवी वस्तीत शिरल्याचे समजताच नागरिकांची धावपळ उडाली. तब्बल सहा तास वस्तीत ठाण मांडून बसलेल्या गव्याने परिसरात थरारासह दहशतीचे वातावरण निर्माण केले. घाबरलेल्या नागरिकांपैकी वाडीवस्तीतील ५० भर तरुणांनी मोठ्या धाडसाने विविध मार्गाचा अवलंब करून गव्याला वस्तीबाहेर काढण्यासाठी दोन ते तीन तास प्रयत्न करूनही गवा वस्ती बाहेर पडला नाही.
दरम्यान गवा मानवी वस्तीतून बाहेर जात नसल्यामुळे नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र मलकापूर प्रादेशिकचे वैष्णवी जावळे, वनरक्षक घोळसवडे यांच्यासह रेस्क्यू टीम तसेच वनपरिक्षेत्र वन्यजीव आंबा यांच्याकडील कोमल मराठे, वनरक्षक वन्यजीव, सुदर्शन कडवेकर वनसेवक आदींनी फटाक्यांच्या आवाजाने गव्याला मानवी वस्तीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करूनही तो बाहेर जात नव्हता. यानंतर दमलेल्या गव्याला एका जागेवर थांबण्यास भाग पाडले आणि नागरिकांचा गोंगाट कमी करून काही काळ शांतता राखली. अखेर सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर ठोकली आणि नागरिकांचा जीव भांड्यात पडला.