राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहा बॉक्सिंगपटूंची निवड
बेळगाव : बंगळूर येथे कर्नाटक राज्य बॉक्सिंग फेडरेशन आयोजित चौथ्या सब जुनियर मुला मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेत बेळगावच्या बॉक्सिंगग्पटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. नोएडा उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी बेळगावच्या सहा बॉक्सिंग पटूंची निवड झाली आहे. बेंगळुर कंटीरवा मैदानावरती घेण्यात आलेल्या बॉक्सींग स्पर्धेत बेळगाव जिल्हा बॉक्सींग खेळाडूंनी भाग घेतला होता. मुलांमध्ये साईनाथ कांबळेने 30 ते 36 किलो वजनी गटात सुवर्णपदक, एमडी अली बाळेकुंद्रीने 35 ते 37 किलो वजनी गटात सुवर्ण, मुलींमध्ये मेघना मुचंडीकरने 30 ते 33 किलो वजनी गटात सुवर्णपदक, भूमिकाने 35 ते 37 किलो वजनी गटात रौप्यपदक, समीक्षा सुतारने 37 ते 40 किलो वजनी गटात सुवर्णपदक, गायत्री हलगेकरने 40 ते 43 वजनी किलो गटात सुवर्णपदक पटकावले आहे. वरील सर्व खेळाडूंची नोएडा उत्तर प्रदेश येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडुना अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर, विशाल निंबाळकर, मल्लाप्पा करगुप्पी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तर युवजन क्रीडा अधिकारी बी श्रीनिवास यांचे प्रोत्साहन लाभले आहे.