सीना नदीवरील सहा बंधारे पाण्याखाली
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
दक्षिण सोलापूर :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीवरील नंदुर, वडकबाळ दगडी पूल, सिंदखेड, राजूर, औराद व बंदलगी येथील सहा बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासन व स्थानिक प्रतिनिधींनी केले आहे.
- पावसाचा जोर आणि विसर्ग वाढण्याची शक्यता
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यासह पुणे विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून सीना नदीत आज, १६ ऑगस्ट रोजी तब्बल ३६ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. प्रशासनाने सांगितले आहे की, गरज पडल्यास विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की, कोणीही नदीपात्रात उतरू नये, आणि नदीपात्रात असलेले जनावरे वा तत्सम साहित्य तातडीने हलवावे. सखल भागांतील नागरिकांना वेळेवर सूचना देऊन योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सध्या उजनी धरण १००% भरले असून, त्यातील पाण्याचा विसर्गही सीना व भीमा नद्यांमध्ये सोडण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली असून शेती व जनजीवनावर त्याचा गंभीर परिणाम होऊ लागला आहे.
- शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
औरादचे पोलीस पाटील सैपन बेगडे, माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी, आणि प्रगतिशील शेतकरी मल्लाया हिरेमठ यांनी नागरिकांनी सावध राहावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
दरम्यान, वडकबाळ येथील शेतकरी पुजारी यांची नदीकडील सुमारे दीड एकर शेती पाण्यामुळे वाहून गेली आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.